Khushboo Patani NEET Protest: देशातील NEET पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मागील एक महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. २० जुलैला सीजेपीच्या या मोर्चात तरुण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला व अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात असून सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी विद्यार्थ्यांवरील या लाठीचार्जचा विरोध केला आहे. दिल्लीतील या आंदोलनामध्ये अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी सहभागी झाली होती. खुशबूने सोशल मीडियावर पोलिसांचा लाठीचार्ज आणि या आंदोलनाचा अनुभव शेअर केला आहे.

अभिनेत्री दिशा दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी ही देखील दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झाली होती. तिने तिची ओळख लपवत चेहऱ्यावर मास्क, डोक्यावर कॅप घालून आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. या आंदोलनातील अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. खुशबू पटानीने आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व पुरुषांचं कौतुक केले आहे. ‘जनरेशन झेड’च्या जिद्दीची आणि एकजुटीची प्रशंसा केली.

आंदोलनातील वातावरण महिलांसाठी सुरक्षित – खुशबू पाटनी

खुशबू म्हणाली, “आंदोलनाच्या ठिकाणी लाखो लोक उपस्थित असूनही महिलांना कुठेही असुरक्षित वाटले नाही. अनेक जण गर्दीत महिलांना धक्का लागू नये म्हणून दोन्ही हात वर करून चालत आहेत आणि महिलांची काळजी घेत आहे. आंदोलनातील वातावरण सुरक्षित असून मी अशी महिलांना आदर देणारी मुले कुठेच पाहिली नव्हती, पण या आंदोलनामध्ये पाहिली. ते महिलांना पाणी देत आहेत आणि त्यांची विचारपूस करत आहेत,”

खुशबू म्हणाली, “मी आता Gen Z ची चाहती झाले आहे. आंदोलनामध्ये आलेले सर्व तरूण हे उच्च-शिक्षित आहेत. हे झेन-झी लोक सगळ्यांचीच खूप काळजी घेत आहेत, जर सगळेच असे असते तर अशी मारहाण केली नसती. झेन-झी मुलीही खूप दमदार आहेत. मी तर महिलांना नेहमीच पाठिंबा देते, पण आता नव्या पिढीतील तरुण मुले मला जास्त आवडली आहेत,”

पुढे ती म्हणाली, “हे आंदोलन मी लाइव्ह बघितले आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलक होते तर कायदा अंमलबजावणी करणारे हजारोच्या संख्येने होते. एकावर जरी लाठीचार्ज केला तरी त्याच्यावर इतर आंदोलक वाचवण्यासाठी जात होते. जगभरातील आंदोलनांकडे बघा आणि आमच्या आंदोलनाकडे पाहा. आमच्या Gen Z विद्यार्थ्यांनी शांततेचा मार्ग निवडला आहे. त्यांनी लाठी चार्ज सहन केला पण कोणावरही हात उचलला नाही किंवा कोणालाही मारहाण केली नाही. काहींच्या डोक्यावर आणि पायांवर मारण्यात आले आहे. मुलींना पण खूप मारहाण झाली. मी स्वतः पळत होते आणि मलाही थोडी मारहाण झाली. काय घडत आहे हे पाहिल्यावर सगळे आंदोलक पळायला लागले,”