Khusboo Patani rescues abandoned child: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीची बहीण खुशबू पाटनी सध्या चर्चेत आली आहे. खुशबू पाटनी माजी लेफ्टनंट आहे. ती भारतीय सैन्यात कार्यरत होती. आता तिने बेवारस बाळाचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने या बाळाला वाचवल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर खुशबू पाटनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये खुशबूला बरेलीमधील तिच्या घराजवळच्या एका पडीक जागेत एक लहान बाळ सापडले. बाळाचा आवाज ऐकून ती तिथे येते. रडणाऱ्या बाळाला उचलते, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. त्याला बाळाला उचलून घेत खुशबू त्याला चांगल्या ठिकाणी पोहोचवले जाईल, असेही ती म्हणत आहे.
खुशबू पाटनी काय म्हणाली?
पुढे खुशबू पाटनी त्या बाळाचा चेहरा व्हिडीओमध्ये दाखवीत म्हणाली, “जर तुम्ही बरेलीमधून असाल आणि हे तुमचे बाळ असेल, तर तुम्ही मला सांगा पालक त्यांच्या बाळाला असे कसे सोडू शकतात? अशा पालकांना लाज वाटली पाहिजे.” खुशबू नागरिकांना विनंती करीत म्हणाली, “या मुलीचे फोटो शेअर करा.” पुढे या व्हिडीओमध्ये ती या बाळाला राधा या नावाने संबोधताना दिसत आहे. तसेच तिने सोशल मीडिया युजर्सना या केसमध्ये पुढे काय होईल, हे ती कळवत राहील, असेही तिने म्हटले आहे.
खुशबूने पोलीस अधिकाऱ्यांकडे त्या बाळाला सोपवल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. तसेच तिने म्हटलेय की, मी आशा करते की अधिकारी तिची काळजी घेतील. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ती योग्य हातात जाईल आणि तिचे आयुष्य इथून पुढे समृद्ध असेल, याची मी काळजी घेईन.” खुशबूच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी आणि कलाकारांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले आहे. दिशा व भूमी पेडणेकरनेदेखील कमेंट्स केल्या आहेत. दिशाने लिहिले, “देवाचा आशीर्वाद तुम्हा दोघांना मिळू दे”, भूमी पेडणेकरने लिहिले, “हा व्हिडीओ बघून मी रडले. हे खूप वाईट आहे. देवाने तुला त्या बाळाला वाचविण्यासाठी पाठवले.”
खुशबूने आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर करीत पोलिसांना बाळाचे आई-वडील सापडल्याचे लिहिले आहे. ती सुरक्षित असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच बाळाच्या आई-वडिलांबाबतही तिने व्हिडीओमध्ये वक्तव्य केले आहे. मला तिची आठवण येईल, असेही हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे.