Bollywood Actress Divya Bharti : बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी कमी वयातच इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. पुढे इंडस्ट्रीत आपलं नावही कमावलं. अशा काही अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिव्या भारती. अवघ्या १६ वर्षांची असताना दिव्या भारती या इंडस्ट्रीत आली; पण केवळ १९ व्या वर्षी तिचं निधन झालं.
दिव्यानं अवघ्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत २२ चित्रपटांमध्ये काम केलं. तिची तुलना थेट श्रीदेवींशी केली जात होती. ती मोठी होऊन भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री बनणार, असं अनेक जण म्हणायचे; मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.
५ एप्रिल १९९३ रोजी मुंबईतील तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. कमी वयात प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य हे खूप गुंतागुंतीचं होतं. यश, पैसा आणि लोकप्रियता असूनही अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यात खूप अस्वस्थ होती. याबद्दल तिचे मित्र बालकलाकार मास्टर राजू यांनी प्रतिक्रिया दिली.
बालकलाकार मास्टर राजू आणि दिव्या भारती यांची घट्ट मैत्री होती. अलीकडेच मास्टर राजू यांनी सिद्धार्थ कन्ननशी बोलताना मैत्रीण दिव्या भारतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही आठवणी शेअर केल्या.
ते म्हणाले, “दिव्या भारती आणि पूजा भट्ट या दोन अभिनेत्री माझ्या खूप खास मैत्रिणी होत्या. त्या दोघीही अत्यंत साध्या आणि मनमिळाऊ होत्या. मी दिव्याबरोबर बराच वेळ घालवायचो. आम्ही अनेकदा एकत्र डिस्को आणि बारमध्ये जात असू. सलमान खानप्रमाणेच दिव्याही माझी खूप जवळची मैत्रीण होती. आम्ही तासन् तास गप्पा मारायचो. तिच्याबरोबर जे घडलं, ते अत्यंत दुर्दैवी आहे. काही गोष्टी आज सार्वजनिकपणे सांगाव्याशा वाटत नाहीत, विशेषतः ती आता आपल्यात नाही हे…”
स्वत:चा वापर होतोय असं तिला वाटत होतं
यश मिळत असूनही दिव्या वैयक्तिक आयुष्यात असमाधानी होती, असं त्यांनी सूचित केलं. ते म्हणाले, “तिने मला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या आणि काही लोकांची उदाहरणंही दिली होती. ती तेव्हा दुःखी होती; मात्र आज कोणाची नावं घेऊन वाद निर्माण करणं योग्य नाही. तिला असं वाटायचं की, तिचा वापर केला जात आहे. तिच्या पैशांचा गैरवापर केला जातोय, अशी भावना तिच्या मनात होती. त्यामुळे ती अस्वस्थ होती.”
पाचव्या मजल्यावरून पडून दिव्याचा मृत्यू
दिव्या भारतीने १९९० मध्ये तमीळ चित्रपट ‘नीला पेन्ने’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि अल्पावधीतच ती हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली. ५ एप्रिल १९९३ रोजी संध्याकाळी ती मुंबईतील बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावरून खाली पडली. तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

