Divya Bharti Death Mystery: रुपेरी पडद्यावर येताच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. सौंदर्य, निरागस हास्य आणि प्रभावी अभिनयाच्या जोरावर तिने कमी वयामध्ये लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. १९९० मध्ये तेलुगू चित्रपट ‘बोब्बिली राजा’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर तिने ‘विश्वात्मा’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. विशेषतः ‘दीवाना’ या चित्रपटातील दिव्या भारतीच्या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ‘सात समुंदर पार’ या गाण्यातून ती रातोरात स्टार बनली. जसे तिचे यश हे चर्चेमध्ये आले होते, तसाच तिचा अकाली मृत्यूही सर्वांच्या मनाला चटका लावणारा होता. दिव्या भारतीचा मृत्यू नेमका कसा झाला आणि त्यावेळी काय घडलं होतं हे अभिनेत्री गुड्डी मारुतीने सांगितले आहे.
अभिनेत्री गुड्डी मारुतीने २०२४ साली दिलेल्या मुलाखतीमध्ये दिव्या भारतीचा मृत्यू कसा झाला आणि त्यावेळी नेमकं कोण उपस्थित होतं, याबद्दल सांगितले. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुड्डी मारुतीने दिव्या भारतीचा स्वभाव आणि तिचा निरागसपणा याबद्दल आठवणी सांगितल्या. तसेच दिव्या भारतीच्या शेवटच्या दिवसांमध्ये काय घडलं होतं आणि तिचा मृत्यू हा तिच्या कुटुंबीयांसाठी मोठा मानसिक धक्का असल्याचे गुड्डी मारुतीने सांगितले होते.
मृत्यूच्या आदल्या दिवशी दिव्या भारती होती उदास
१९९३ मध्ये पाचव्या मजल्यावरून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता, त्यावेळी ती अवघ्या १९ वर्षांची होती. गुड्डी म्हणाली, “ती एक छान पण थोडी चंचल व गोंधळलेली मुलगी होती. मला तिच्या बालपणाबद्दल माहीत नाही, पण ती जरा अस्वस्थ असायची. ती तिचा प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस असल्याप्रमाणे आयुष्य जगायची. ती खूप स्वच्छंदी, छान मुलगी होती. ती साजिद नाडियादवाला बरोबर होती, तेव्हा आम्ही ‘शोला और शबनम’चे शूटिंग करत होतो. तिचा मृत्यू ५ एप्रिलला झाला आणि त्याच्या एकदिवस आधी ४ एप्रिलला माझा वाढदिवस असतो. माझ्या वाढदिवसाला आम्ही सगळे एकत्र पार्टी करत होतो. गोविंदा, दिव्या, साजिद आणि बाकीचे काही जण होते. पण त्या पार्टीमध्ये दिव्या जरा उदास होती. कारण एक आऊटडोअर शूटिंग होते आणि तिला ते करायचे नव्हते,”
एका प्रसंगाची आठवण करुन देत गुड्डी मारुती म्हणालेली, “दिव्या ही जुहू येथील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहायची. एका रात्री मी त्या इमारतीजवळील आईस्क्रीमच्या दुकानात जात होते. तेवढ्यात कोणीतरी माझं नाव घेऊन हाक मारली. मी वर पाहिलं तर दिव्या पाचव्या मजल्यावरील कठड्यावर पाय लटकवून बसलेली दिसली. मी तिला लगेचच तिथून आत जाण्यास सांगितलं आणि ते सुरक्षित नसल्याचंही सांगितलं. मात्र तिने हसत उंचीची अजिबात भीती वाटत नसल्याचं सांगितलं होतं. पण तिला असं बघून मलाच भीती वाटली होती.”
तेव्हा रक्ताने तोंड माखलेली मांजर आली – गुड्डी मारुती
दिव्या भारतीच्या निधनानंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. साजिदसुद्धा पूर्णपणे कोसळला होता, अशी आठवण गुड्डी मारुतीने सांगितली होती. पुढे ती म्हणाली, “दिव्याच्या निधनानंतर पाहुणे येऊन दिव्याच्या आईचे सांत्वन करत होते. तेव्हा रक्ताने तोंड माखलेली मांजर तिथे शिरली होती. अचानक आलेली ती भटकी मांजर पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. हे सगळं खूपच भयंकर आणि दुःखद होतं,”
नीता लुल्ला हिने दिव्याला खाली पडताना पाहिलं – गुड्डी
पुढे गुड्डी म्हणाली, “अपघाताच्या वेळी साजिद नाडियाडवाला घरी उपस्थित नव्हता. साजिदची गाडी आली आहे का हे पाहण्यासाठी दिव्या खिडकीतून खाली पाहत होती. याचदरम्यान तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यावेळी फॅशन डिझायनर नीता लुल्लादेखील फ्लॅटमध्ये उपस्थित होती. दिव्या आणि नीता बोलत होत्या. तेव्हा दिव्या गाडी आली का हे पाहण्यासाठी गेली, तेव्हा नीतानं दिव्याला पडताना पाहिलं होतं.”
