Divya Bharti last shooting : बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री झाल्या आहेत, ज्यांना एखाद्या गाण्याने किंवा सिनेमाने एका रात्रीत स्टार बनवले आहे. प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अनेक अभिनेत्रींची चर्चा रंगते; पण काळाच्या ओघात त्यांचे विस्मरण होते. बॉलीवूडचा एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री नंतर अगदी सामान्यांप्रमाणे आयुष्य जगू लागतात आणि मग चाहतेही त्यांना विसरून जातात. पण, बॉलीवूडमध्ये ९० च्या दशकामध्ये अशी एक अभिनेत्री होऊन गेली, जिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य तर केलंच; पण प्रेक्षकही तिला कधीच विसरू शकले नाहीत आणि ती अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. वयाच्या अगदी १६ व्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दिव्याने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना घायाळ केले होते.
दिव्या भारतीने दाक्षिणात्य सिनेविश्वातून पदार्पण करीत बॉलीवूडमध्येही प्रचंड लोकप्रियता मिळवली. विश्वात्मा या पहिल्याच चित्रपटापासून तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. त्यानंतर तिची व शाहरुखची ‘दीवाना’ चित्रपटातील जोडी प्रचंड गाजली. तिला प्रेक्षकांनी अमाप प्रेम दिले. प्रभावी अभिनय आणि सौंदर्यामुळे तिने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली होती; पण बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या अभिनेत्रीवर काळाने अचानक घाला घातला. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिचे आकस्मिक निधन झाले. अपघातामुळे झालेल्या तिच्या निधनाची आजही चर्चा रंगते. निधनापूर्वी ती सिनेमाचे शूटिंग करीत होती. सिनेविश्व गाजवलेल्या दिव्या भारतीने मरणापूर्वी कोणता शेवटचा शॉट शूट केला होता, याबद्दल चित्रपटाचे लेखक अनीस बज्मी यांनी आठवण सांगितली.
दिव्या भारती ‘लाडला’ सिनेमाचं करीत होती शूटिंग
दिव्या भारतीच्या आकस्मिक निधनामुळे ‘लाडला’ चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पुन्हा करावे लागले होते. चित्रपटाचे जवळपास ९५ टक्के शूटिंग पू्र्ण झाले होते. पण, दिव्याच्या निधनामुळे पु्न्हा अभिनेत्री श्रीदेवीसह हे शूटिंग करावे लागले होते. आता या चित्रपटाचे लेखक अनीस बज्मी यांनी दिव्याच्या आठवणी सांगितल्या आहेत. दिव्याने शेवटचा कोणता सीन शूट केला होता याबद्दल त्यांनी सांगितले आहे. दिव्याच्या निधनामुळे जवळपास पूर्ण झालेला चित्रपट पुन्हा नव्याने तयार करण्याची वेळ आल्याचे अनीस बज्मी यांनी सांगितले आहे.
दिव्या भारतीच्या आठवणी सांगत असताना अनीस बज्मी म्हणाले, “तो काळ खूपच दुःखद आणि दुर्दैवी होता. आम्ही दिव्या भारतीबरोबर जवळपास संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. तिनं नेहमीप्रमाणेच खूप सुंदर काम केलं होतं; पण क्लायमॅक्सचं शूटिंग होण्यापूर्वीच तिचं निधन झालं. या घटनेमुळे संपूर्ण टीम हादरून गेली होती. जवळपास दोन महिने चित्रपटाचं कोणतंच काम झालं नाही. शूटिंगही थांबलं आणि निर्मात्यांचीही काळजी वाढली होती. सिनेमाचं सगळंच शूटिंग पूर्ण झालं होतं. फक्त काही सीन शूट करायचे राहिले होते. आता पुढे काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आम्हाला पडला होता.”
दिव्या भारतीनंतर श्रीदेवीने केलं होतं काम
ते पुढे म्हणाले, “तिच्या निधनामुळे आम्ही प्रत्येक जण खूपच दुःखात होतो. त्यानंतर आता पुन्हा एकदा संपूर्ण सिनेमाचं शूटिंग करावं लागणार असल्याची वस्तुस्थिती स्वीकारण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला. त्यावेळी जवळपास ९० ते ९५ टक्के चित्रपटाचं काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर श्रीदेवी यांना चित्रपटासाठी विचारलं. त्यांनी याच कथेच्या तमीळ व तेलुगू सिनेमांसाठी नकार दिला होता; पण आम्ही काही बदल केल्यामुळे त्यांनी ‘लाडला’ चित्रपटासाठी होकार दिला.”
काय होता दिव्या भारतीचा शेवटचा सीन?
अनीस बज्मी यांनी दिव्या भारतीने निधनाच्या आधी कोणता सीन शूट केला होता आणि तिचा डायलॉग काय होता याबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले, “दिव्याच्या निधनामुळे मला माझ्या दोन चित्रपटांचे ‘लाडला’ व ‘अंगरक्षक’ या सिनेमांचे पुन्हा शूटिंग करावे लागले. मला आठवतं की, आम्ही चेन्नईमध्ये शूटिंग करीत होतो. दिव्याच्या निधनाच्या आदल्या दिवशीच आम्ही तिच्याबरोबर शूटिंग करीत होतो. तिच्या शेवटच्या सीनमध्ये ती कॅमेऱ्यापासून दूर चालत जात होती आणि ती हळूहळू फोकसपासून लांब गेली. यावेळी मास्क घातलेले काही लोक तिला ओढून घेऊन जात असतात. या सीनमध्ये तिचा शेवटचा डायलॉग होता, ‘मला वाचवा…’ (मुझे बचाओ). आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्हाला तिच्या निधनाची बातमी कळाली.”
दिव्या भारतीचं आकस्मिक निधन
५ एप्रिल १९९३ रोजी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी दिव्या भारतीचं निधन झालं. मुंबईतील तिच्या राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून तिचे अपघाती निधन झाले. खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवल्यानंतर आणि यशाच्या शिखरावर असताना दिव्याचे निधन झाल्याने संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. आजही चाहते तिची आठवण काढत असतात.
