अभिनेता गोविंदा सध्या व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद सोशल मीडियावर चर्चेत आहेत. गोविंदाचं नाव त्याची सह-कलाकार कोमल राणी स्वर्णकार हिच्याशी जोडलं जातंय. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दिव्या खोसला हिने गोविंदा आणि कोमल यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाला पाठिंबा दिला होता. आता दिव्याने लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान कोमल राणीचा लूक आणि तिच्या कपाळावर कुंकवावर प्रश्न उपस्थित केला आहे.
२२ सप्टेंबरला गोविंदा कोमल राणीबरोबर लालबागचा राजाच्या दर्शनाला गेला होता. तर सुनीता आहुजा एकटी गेली होती. दिव्या खोसलाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान कोमल राणीच्या कुंकवावर प्रश्न उपस्थित करत लिहिलं, “आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात जे काही करतो, ती आपली मर्जी असते. पण कमीत कमी समाजात राहताना सामाजिक मर्यादा पाळणं गरजेचं आहे.”
कोणाला मूर्खात काढताय? दिव्याने उपस्थित केला प्रश्न
कोमल राणीच्या दर्शनाचा उल्लेख करत दिव्या पुढे म्हणाली, “एक मुलगी तुमच्याबरोबर धार्मिक ठिकाणी जाते आणि अशा प्रकारे वाकून दर्शन घेते की तिच्या कपाळावरील कुंकू स्पष्ट दिसू लागतं. यामुळे तुमच्याबद्दल चर्चा होते. पण खरंच… तुम्ही कोणाला मूर्खात काढताय? आणि तीच मुलगी तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील खासगी गोष्टींवर भाष्य करते. तुम्हाला हा खेळ किंवा गंमत वाटते का?”

दिव्या पुढे म्हणाली, “कमीत कमी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा अजेंड्यासाठी आपल्या धर्माचा वापर करणं बंद करा. तुम्हाला कुंकवाचं महत्त्व तरी समजतं का? ती एका विवाहित हिंदू स्त्रीची सर्वात पवित्र आणि शक्तिशाली ओळख आहे. अशा गोष्टींचं समर्थन करणाऱ्या कलाकारांना पाहून मला खूप वाईट वाटतंय.”
दरम्यान, गोविंदाने चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करण्यासाठी कोमल राणीबरोबर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्याचं म्हटलं होतं. “आमचं नातं फक्त प्रोफेशनल आहे, पण आमचं अफेअर असेल तरी तुम्हाला काय? तो तुमच्या चर्चेचा मुद्दा नाहीच,” असं तो म्हणाला होता. दुसरीकडे कोमल राणीने सुनीतावर गोविंदाला मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले होते. जो संसार आधीच मोडलाय, तो इतर कुणी मोडू शकत नाही, असंही ती म्हणाली होती.
