Madhuri Dixit Birthday : बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आज तिचा ५९ वा वाढदिवस साजरा करतेय. अभिनेत्रीने १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. पण, तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी ‘तेजाब’ चित्रपटामुळे मिळाली. हळुहळू माधुरी बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने लग्न केलं. १९९९ मध्ये तिने डॉ. श्रीराम नेनेंशी लग्नगाठ बांधली. आज लाडक्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नेनेंनी खास पोस्ट शेअर केली आहे.

माधुरीच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नेनेंनी खास मराठी गाणं लावून पोस्ट शेअर केली आहे. खरंतर, अमेरिकेत शिक्षण पूर्ण झाल्याने नेनेंना हिंदी नीट येत नाही, असं माधुरीने आधीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. मराठी कुटुंबात जन्म झाल्याने नेनेंना मराठी व्यवस्थित समजतं. त्यामुळे बायकोला इम्प्रेस करण्यासाठी त्यांनी गोड फोटो शेअर करत या पोस्टला मराठी गाणं लावलं आहे, या गाण्याचे बोल आहेत…

चांद तू नभातला नि बावळा चकोर मी
गुलाम होउनी तुझा… उभा तुझ्या समोर मी
तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी,
तनामनात माझिया तुझी सदैव मोहिनी

यासह नेने लिहितात, “माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आपण येत्या वर्षांत सुद्धा असेच विविध ठिकाणी फिरायला जाऊयात…तू मला आणि आपल्या कुटुंबाला कायम साथ दिलीस, कायम आमच्या पाठिशी राहिलीस…याबद्दल तुला खूप प्रेम!”

श्रीराम नेनेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “खूप-खूप प्रेम”, “हे आहे खरं प्रेम”, “वाह काय गाणं सिलेक्ट केलंय कमाल”, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माधुरी मॅम”, “Our धकधक गर्ल”, “एव्हरग्रीन कपल”, “याला म्हणतात प्रेम” अशा विविध प्रतिक्रिया नेनेंनी शेअर केलेल्या पोस्टवर आल्या आहेत.

दरम्यान, १९९९ रोजी माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. या दोघांचं अरेंज मॅरेज आहे. तेव्हा श्रीराम नेने अमेरिकेत राहायचे. त्यामुळे माधुरी आणि श्रीराम नेने यांचा लग्नसोहळा अमेरिकेत पार पडला होता. या दोघांच्या मुलांची नावं आहेत रायन आणि अरीन. आता अभिनेत्री लवकरच ‘मां बहन’ चित्रपटात झळकणार आहे. ४ जूनला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.