अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या शोमुळे तर, डॉ. नेने त्यांच्या आरोग्यविषयक नव्या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या पुस्तकाचं नाव आहे ’21 Days to Good Health’! १० ऑक्टोबरला या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकातून डॉ. नेनेंनी निरोगी आयुष्य कसं जगावं, तुमच्या काही चुकीच्या सवयी भविष्यात तुमच्या आरोग्यासाठी कशाप्रकारे घातक ठरू शकतात, याची माहिती दिली आहे.
डॉ. श्रीराम नेने ‘दैनिक भास्कर’शी संवाद साधताना म्हणाले, “मी एक हार्ट सर्जन आहे आणि आजवर मी अनेक रुग्णांना मृत्यूच्या दारात असताना रुग्णालयात पाहिलंय. काही रुग्णांचे प्राण आम्ही अगदी काही मिलिसेकंदांच्या फरकाने वाचवले आहेत. हा सगळा परिणाम आपण २०-३० वर्षे जी लाइफस्टाइल जगत असतो, त्याचा आहे. त्यामुळे लोकांना आजारी पडण्यापूर्वीच आरोग्यदायी सवयी शिकवणं फार महत्त्वाचं आहे.”
डॉ. नेने पुढे सांगतात, “१९६० च्या दशकात स्टिक सर्जन मॅक्सवेल माल्ट्झ यांनी सांगितलं होतं की, एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला साधारण २१ दिवस लागतात. मात्र, अलीकडचा काळ बदलला आहे…कोणतीही नवीन सवय अंगीकारण्यासाठी आपल्याला साधारणपणे ५६ ते ६६ दिवस लागू शकतात. यातही सातत्य असणं गरजेचं आहे.”
निरोगी आरोग्याचे पाच आधारस्तंभ
नेने आपल्या पुस्तकाबद्दल सांगतात, “माझ्या पुस्तकात मी चांगल्या, निरोगी आरोग्याचे पाच प्रमुख आधारस्तंभ सांगितले आहेत. आहार, शारीरिक हालचाल, पुरेशी झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट-मानसिक दृष्टीकोन, सोशल कनेक्शन-जीवनाचा उद्देश या पाच गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका. दैनंदिन जीवनात तुम्ही या सगळ्या गोष्टींबाबत क्लिअर असाल तर, एकूणच तुमच्या जीवनमानामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात.”
“सोशल मीडियावर आरोग्याशी निगडीत अनेक बातम्या असतात. विशेषत: करोना काळात सगळेच स्वत:ला तज्ज्ञ समजत होते. त्यामुळे ठोस पुरव्याशिवाय कोणत्याही इन्फ्लुएन्सर्सवर विश्वास ठेऊ नका. ‘एआय’ (AI) द्वारे मिळणाऱ्या माहितीची पडताळणी करणंही गरजेचं आहे.” असं नेनेंनी सांगितलं.

भारतातील बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी याबाबत नेने सांगतात, “तुम्ही कदाचित जिममध्ये एक तास व्यायाम करत असाल, पण जर दिवसातील उर्वरित साडेअकरा तास तुम्ही बसूनच राहिलात, तर तो एक तासाचा व्यायामही पुरेसा ठरणार नाही. आपल्याला आहारासह दिवसभरातील एकूण हालचालींकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. पुरेशी झोप, मानसिक शांतता आणि तणावाचं योग्य व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे. फोन, ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया आपला बराच वेळ जातो, तर जमेल तसं या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे. ’21 Days to Good Health’ हे पुस्तक लहान-लहान भागांमध्ये विभागलं गेलंय, जेणेकरून वाचकांना एकाच दिवसात सर्व काही बदलण्याची गरज वाटू नये.”
“२१ दिवस ही केवळ सुरुवात आहे. लोकांमध्ये कायमस्वरुपी आरोग्यदायी सवयी रुजवणं हा माझा मूळ हेतू आहे, हेच माझं ध्येय आहे. जेणेकरून लोक आरोग्याकडे लक्ष देतील आणि भविष्यातील अनेक समस्यांपासून दूर राहतील. कदाचित भविष्यात शस्त्रक्रियेची गरजही भासणार नाही.” असं नेनेंनी सांगितलं.

२१ किलो वजन घटवलं…
स्वत:च्या आरोग्याला किती गुण द्याल असं विचारलं असता नेने म्हणाले, “सध्या तरी, मी स्वतःला १० पैकी ११ गुण देईन! कारण, माझं २१ किलो वजन कमी झालं आहे. मी आठवड्यातून ६ दिवस व्यायाम करतो, कमी कॅलरीजचं सेवन करतो आणि माझे ‘ॲब्स’ (पोटाचे स्नायू) देखील स्पष्ट दिसू लागले आहेत. आपण बँका आणि शेअर बाजारात गुंतवणूक करतो, पण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी आपण किती गुंतवणूक करतो? केवळ दीर्घायुष्य जगण्यापेक्षा निरोगी आयुष्य जगणं अधिक महत्त्वाचं आहे.”
