‘दृश्यम ३’च्या रिलीजला आता फक्त तीन दिवस बाकी आहेत. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू असून आतापर्यंत चांगली तिकीट विक्री झाली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, अजय देवगणचा हा चित्रपट २०२२ मध्ये आलेल्या ‘दृश्यम २’ पेक्षा रिलीजच्या दिवशी अधिक कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ‘दृश्यम ३’ने पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून ८.९७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅक्निल्कच्या वृत्तानुसार, चित्रपटाची २.२४ लाख तिकिटं विकली गेली असून ७,५०५ शो बुक झाले आहेत. पहिल्या तीन दिवसांसाठी सुरू झालेल्या अॅडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने आतापर्यंत १७.३५ कोटी रुपये कमावले आहेत. यात ब्लॉक सीट्सची रक्कम वगळल्यास ही कमाई ११.१२ कोटी रुपये आहे. या क्राइम ड्रामाची भारतात सुमारे ४० कोटी रुपयांची ओपनिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘दृश्यम ३’ने दुसऱ्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून ४.५२ कोटी रुपयांची कमाई केली असून ६,८४८ शोसाठी १.२० लाख तिकिटं विकली गेली आहेत. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ३.८६ कोटी रुपयांची कमाई केली असून ६,७२० शोसाठी १.०६ लाख तिकिटं विकली गेली आहेत.
दरम्यान, पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये महाराष्ट्रातून २.९३ कोटी रुपये, तर दिल्लीमधून २.१९ कोटी रुपये मिळाले आहेत.
दृश्यम ३ आणि दृश्यम २ बॉक्स ऑफिस कलेक्शन
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दृश्यम २ने रिलीजच्या दिवशी भारतात १५.३८ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं होतं. चित्रपटाची देशाअंतर्गत कमाई १८.१५ कोटी रुपये होती. तर पहिल्या वीकेंडमध्ये अजय देवगणच्या या चित्रपटाने एकूण ६४.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती.
विशेष म्हणजे, हिंदीतील दृश्यम ३ची ओपनिंग त्याच्या मल्याळम व्हर्जनपेक्षा मोठी होण्याची शक्यता आहे. जीतू जोसेफ दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनीत मल्याळम दृश्यम ३ने २१ मे रोजी रिलीजच्या दिवशी भारतात १५.८५ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं. तर पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने ५४.४४ कोटी रुपये कमावले. मल्याळम चित्रपटांच्या ऑल टाइम कलेक्शनच्या यादीत सध्या पाचव्या क्रमांकावर असलेल्या दृश्यम ३ने थिएटरमधील प्रदर्शनादरम्यान जगभरात २३९.८३ कोटी रुपयांची कमाई केली.
