Drishyam 3 Box Office Collection Day 1 Ajay Devgn: अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ या चित्रपटाने शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ५६.०४ कोटी रुपयांचे बंपर कलेक्शन केले आहे. हा अजय देवगणच्या संपूर्ण करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून, यापूर्वीच्या ‘सिंघम अगेन’च्या रेकॉर्डला त्याने मागे टाकले आहे.

सिंघम अगेनचा रेकॉर्ड मोडला

इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’वरील माहितीनुसार, दृश्यम ३ ने शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत भारतात एकूण ५६.०४ कोटी रुपयांची कमाई केली. हा अजय देवगणच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’च्या नावावर होत. सिंघम अगेनने पहिल्या दिवशी ४५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

दृश्यम: द कन्क्लुजनला समीक्षक व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटातील कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे. तर, कथानकही दमदार आहे. हा दृश्यम फ्रेंचायझीचा शेवटचा सिनेमा आहे. अजय देवगण, तब्बू व जयदीप अहलावत यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. दृश्यम ३ चे बजेट ११० ते १३० कोटींदरम्यान आहे.

अजय देवगणचे सुपरहिट चित्रपट

अलीकडच्या काळात सलमान खानसह अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले, पण अजय देवगणच्या चित्रपटांनी मात्र चांगले कलेक्शन केले आहे. सूर्यवंशी, दृश्यम २, आरआरआर, रेड २ आणि धमाल ४ यांनी बॉक्स ऑफिस गाजवलं.

दरम्यान, पहिला दृश्यम २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने ५.८५ कोटींचे ओपनिंग कलेक्शन केले होते. या चित्रपटाने जगभरात ११० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर दृश्यम २ तब्बल सात वर्षांनी २०२२ मध्ये रिलीज झाला होता. १८.१५ कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन करणाऱ्या दृश्यम २ ने जगभरात ३४३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आधीच्या दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत दृश्यम ३ ने जबरदस्त ओपनिंग केली आहे. ते पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई सहज करेल असं दिसतंय.