Drishyam 3 Collection Day 2 : अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित ‘दृश्यम ३’ सिनेमा यंदा बरोबर २ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा या फ्रँचायझीचा तिसरा आणि अखेरचा भाग आहे. ‘दृश्यम ३’मध्ये प्रेक्षकांना अजय देवगण विरुद्ध जयदीप अहलावत असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. दोन भागांच्या यशानंतर तिसऱ्या भागाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळणार याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागलेलं होतं, आणि अपेक्षेनुसार ‘दृश्यम ३’ रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आल्याचं पाहायला मिळत आहे.

२ ऑक्टोबरपासून लाँग वीकेंड असल्यामुळे ‘दृश्यम ३’साठी ही जमेची बाजू ठरली. मुंबई, दिल्ली, पुण्यासारख्या शहरांमध्ये ‘दृश्यम ३’चे सगळे शोज हाऊसफुल्ल झाले आहेत. सलग सुट्ट्या असल्यामुळे रात्रीच्या शोजला प्रेक्षकांची गर्दी होतेय. याशिवाय ‘दृश्यम ३’च्या Advance बूकिंगला सुद्धा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

‘दृश्यम ३’ने २ ऑक्टोबरला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ६२ कोटींचा गल्ला जमवला. यानंतर वीकेंडला शनिवारी ‘दृश्यम ३’ने तब्बल ५३.५० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या सिनेमाचं भारतातील नेट कलेक्शन ११५.५० कोटींपर्यंत पोहोचल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. याशिवाय या चित्रपटाने जगभरात एकूण १७७.१० कोटींची ( Worldwide Gross Collection ) कमाई केली आहे. यामुळे ‘दृश्यम ३’चं संपूर्ण बजेट वसूल झालं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘दृश्यम ३’ सिनेमाचं बजेट हे जवळपास ११० ते १३० कोटी असल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे, या सिनेमा सलमान खानच्या ‘सिकंदर’चा रेकॉर्ड मोडला आहे. ‘सिकंदर’ने भारतात ११०.३६ कोटींची कमाई केली होती. ‘दृश्यम ३’ने दुसऱ्याच दिवशी सिकंदरला मागे टाकत फक्त भारतातच ११५ कोटींचा गल्ला जमावला आहे. आता येत्या काही दिवसांत हा सिनेमा किती कोटींची कमाई करणार, आणखी कोणत्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडणार हे पुढच्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

दरम्यान, ‘दृश्यम ३’मध्ये अजय देवगणसह जयदीप अहलावत, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, प्रकाशराज, इशिता दत्ता, मृणाल जाधव, कमलेश सावंत, सौरभ शुक्ला या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा २ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला असून, हा ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा अखेरचा भाग होता.