Drishyam 3 Marathi Actress : ‘दृश्यम ३’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर अवघ्या दोन दिवसांत या सिनेमाने १०० कोटींची कमाई केली आहे. प्रकाशराज, जयदीप अहलावत, अजय देवगण, तब्बू अशा एकापेक्षा एक दमदार कलाकारांची या सिनेमात मांदियाळी आहे. पण, तुम्हाला माहितीये का? या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री सुद्धा झळकली आहे.
‘दृश्यम’ फ्रँचायझी आणि मराठी कलाकार म्हटलं की, यामध्ये प्रामुख्याने गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते कमलेश सावंत यांचं नाव समोर येतं. तिसऱ्या भागातही कमलेश सावंत आणि अजय देवगण यांचा फेसऑफ पाहायला मिळतो. पण, याच बरोबर एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुद्धा ‘दृश्यम’मध्ये झळकलीये. जिचं नाव आहे नेहा जोशी. यापूर्वी तिने ‘दृश्यम २’मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि त्यामुळेच कथेला अनुसरून तिसऱ्या भागातही तिची भूमिका आहे.
नेहा जोशीने या सिनेमात जेनी थॉमस हे पात्र साकारलं आहे. विजय साळगांवकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर लक्ष ठेवण्यासाठी मीरा जेनीला त्यांच्या शेजारी राहायला पाठवते. जेनी मोठ्या हुशारीने विजयच्या संपूर्ण घरात मायक्रोफोन लावून त्यांचं बोलणं ऐकत असते. जेनी थॉमस असिस्टंट सब इन्स्पेक्टर असून तिसऱ्या भागातही कोर्टाच्या सीक्वेन्समध्ये तिची एन्ट्री होती.
मराठमोळ्या नेहाला या सिनेमात तब्बू, अजय देवगण यांच्यासह सुपरस्टार अभिनेते प्रकाशराज, जयदीप अहलावत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. शूटिंगचा अनुभव सांगताना नेहा लिहिते, “जेनी थॉमस रिपोर्टिंग… ‘दृश्यम ३’ मध्ये या दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना पुन्हा एकदा अनेक गोष्टी शिकता आल्या. खूप छान अनुभव होता…यासाठी मी दिग्दर्शक अभिषेक पाठक यांचे मनापासून आभार मानते. थिएटरमध्ये नक्की जा…आणि सिनेमाचा आनंद घ्या.”
नेहाच्या या पोस्टवर छाया कदम, ओमप्रकाश शिंदे, अनिता दाते या कलाकारांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा नेहावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
