Drishyam 3 Review : चित्रपट कसाही असूदेत शेवटी हिरो जिंकला पाहिजे! हे विजयने ‘दृश्यम’च्या दुसऱ्या भागातच प्रेक्षकांना सांगितलं होतं आणि याच नोटवर तिसऱ्या भागाची सुरुवात होते. यापूर्वीच्या भागात मीराला आपल्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा असतो. पण, यंदा तिचं टार्गेट फिक्स आहे तिला न्याय नकोय, बदला हवाय! आता या खेळात शेवटी कोण बाजी मारणार, विजय साळगांवकर आपल्या कुटुंबाचं रक्षण कसं करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं Drishyam: The Conclusion या सिनेमात प्रेक्षकांना मिळतात.

“सत्य’ वह नहीं है जो असल में हुआ है, बल्कि वह है जो आप लोगों को दिखाते हैं, और जिसे देखने के बाद लोग सच मान लेते हैं”

विजय साळगांवकर या चौथी नापास असलेल्या माणसाने संपूर्ण गोव्याच्या पोलीस डिपार्टमेंटला गेल्या आठ वर्षांपासून हलवून टाकलेलं आहे, आणि याबद्दलचा एक समर्पक डायलॉग मध्यांतरानंतर प्रकाशराज यांनी साकारलेल्या शेट्टी वकिलाच्या तोंडी आहे. तिसऱ्या भागात विजयच्या विरोधात मीरा एकटी नाहीये तर, त्याचा सामना थेट राजवीर सिंग तोमरशी होतो. सिनेमाच्या सुरुवातीला अगदी काही मिनिटांचा पहिल्या दोन भागांचा रिकॅप दाखवण्यात आलाय आणि त्यानंतर स्क्रीनवर दमदार एन्ट्री होते जयदीप अहलावत यांची!

अक्षय खन्नाच्या जागी यावेळी या सिनेमात जयदीप यांची वर्णी लागलीये. खरंतर, ‘दृश्यम ३’मध्ये ‘आम्ही अक्षयला मिस करू’ असं असंख्य सिनेप्रेमींचं मत होतं आणि हेच मत खोडून काढण्यासाठी जयदीप अहलावत यांच्या एन्ट्रीचा सीनही पुरेसा आहे. “मी एसपी क्राइम ब्रँच आहे तुमचा नोकर नाही, मी असा शनि आहे जो एकदा मागे लागला की, तुमची पाठ सोडणार नाही…” असे एकापेक्षा एक दमदार डायलॉग जयदीप यांच्या वाट्याला आले आहेत.

विजय साळगांवकर विरुद्ध राजवीर तोमर हा आमनासामना सिनेमाच्या कथेत एक वेगळं अग्रेशन क्रिएट करतो. यावेळी विजयला हरवायचं नाहीये तर, त्याने गोष्टी कशा लपवल्या हे शोधायचंय! दुसरीकडे गायतोंडे हे पात्र पहिल्या दोन भागांप्रमाणे भाव खावून गेलंय. “कितीही सर-मॅडम येतील-जातील पण, गायतोंडे या केसचा पर्मनंट मेंबर आहे” कमलेश सावंत यांचे जबरदस्त वन लायनर, त्यांचं कॉमिक टायमिंग याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.

Drishyam: The Conclusion
अजय देवगण व जयदीप अहलावत ( Drishyam: The Conclusion )

चित्रपटात मध्यांतराआधी जयदीप अहलावत अजयवर चांगलेच भारी पडलेत. अजय देवगणला जास्त डायलॉग नसले तरीही डोळ्यांनीच त्याने संपूर्ण चित्रपटात आपला प्रेझेन्स अधोरिखित केला आहे. पण, मध्यातरानंतर विशेषत: शेवटच्या अर्ध्या-पाऊणतासात अशा घडामोडी घडतात ज्या, स्पॉयलर देऊनही प्रेक्षकांना कळणार नाहीत. क्लायमॅक्सचा संपूर्ण सीन इतका चक्रावणारा आहे की, प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्याशिवाय तुम्हाला नेमकं काय घडतंय हेच समजणारच नाही आणि याचं क्रेडिट दिग्दर्शक अभिषेक पाठक यांना जातं.

सिनेमात आणखी दोन पात्र दखल घ्यायला भाग पाडतात, ज्यांचा दुसऱ्या भागात फार कमी रोल होता पण, त्यांच्या भूमिकेची खरी गरज आणि ताकद तिसऱ्या भागात अधोरेखित होते. दारूच्या आहारी गेलेला रघू आणि सॅविओ डिसुझा जो चर्चमध्ये कामाला असतो. या दोघांची साक्ष या केसला एक नवीन वळण देते. पण, काही सीन्स पाहिल्यावर हे प्रॅक्टिकली शक्य नाही, चित्रपट फक्त चित्रपटासारखा पाहावा हे देखील जाणवतं.

Drishyam: The Conclusion
Drishyam: The Conclusion

‘दृश्मय ३’मध्ये सॅम जिवंत असेल वगैरे अशा अनेक वावड्या उठवण्यात आल्या होत्या. पण, प्रत्यक्षात अजयने त्याच्या डेडबॉडीचा सोक्षमोक्ष दुसऱ्या भागातच लावलाय. त्यामुळे ‘दृश्यम ३’ पाहायला जाताना पहिल्या दोन भागांचा नीट अभ्यास करून जा, जेणेकरून तिसऱ्या भागात शेवटपर्यंत घडणाऱ्या प्रत्येक सस्पेन्सचा धागा सहज सुटेल.