Drishyam 3 The Conclusion Public X reviews : ‘दृश्यम’ या क्राईम थ्रिलर फ्रँचायझीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. २ ऑक्टोबर तारखेशी या सिनेमाचं खास कनेक्शन आहे आणि यंदा बरोबर याच तारखेला या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘दृश्यम’च्या पहिल्या दोन भागांचा स्क्रीनप्ले हा सेम मल्याळम सिनेमाप्रमाणे होता. पण, आता तिसऱ्या भागाचा स्क्रीनप्ले पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे अजय देवगणच्या सिनेमात नेमकं काय घडणार? विजय साळगांवकरच्या कुटुंबाला न्याय मिळणार की नाही? सॅमचं नेमकं काय झालंय? याचा उलगडा ‘Drishyam 3 : The Conclusion’ मध्ये करण्यात आला आहे.

‘दृश्यम ३’चे सगळे शोज सध्या हाऊसफुल्ल आहे. हा सिनेमा पहिल्याच दिवशी ५० कोटींचं नेट कलेक्शन करेल असा अंदाज Advance बूकिंग आणि तिकिटांच्या आतापर्यंतच्या विक्रीवरून बांधला जात आहे. दुसऱ्या भागात प्रेक्षकांना अक्षय खन्ना पाहायला मिळाला होता. पण, अक्षयने या सिनेमातून माघार घेतल्यामुळे ‘दृश्यम ३’मध्ये जयदीप अहलावत यांची वर्णी लागली. आता प्रेक्षक ‘दृश्यम ३’ पाहिल्यावर नेमकं काय म्हणत आहेत, जाणून घेऊयात…

एक्सवर ( आधीचं ट्विटर ) सध्या ‘दृश्यम ३’चे रिव्ह्यूज आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. नेटकरी म्हणतात, “दृश्यम ३ सारखा सस्पेन्स चित्रपट मी आजवर पाहिलेला नाहीये”, “अजय देवगणने फाडून टाकलंय…जबरदस्त सिनेमा”, “हा चित्रपट अनमोल आहे”, “पैसा वसूल सुपरहिट सिनेमा”, “अक्षय खन्ना तू खरंच घरीच बस कारण…जयदीप सरांनी चित्रपट खाऊन टाकलाय”, “सस्पेन्स थ्रिलर सोडा…असा चित्रपट आहे की, तुम्ही विचारही करू शकणार नाही पुढे काय घडणार”, “पूर्ण डोकं तुमचं हलवून टाकेल असा चित्रपट आहे!”

तर, तरण आदर्श म्हणतात…”Brilliant! खरंतर तिसरा भाग दुसऱ्या भागापेक्षाही कमाल आहे. बॉक्स ऑफिसवर त्सुनामी येणार आहे तयार राहा.”

“जयदीप अहलावत यांची एन्ट्री कमाल आहे…खरंच भूमिका सुद्धा जबरदस्त साकारली आहे आणि तुम्हाला हा चित्रपट पहिल्या दोन भागांपेक्षा आवडेल”, “जयदीप अहलावत पहिल्या भागात फ्रँट फूटवर आहेत आणि अजय देवगण…मध्यांतरानंतर जे काय कमाल करतोय शब्दच नाही….डोळ्यांनी अभिनय केलाय”, “त्याच्या डोळ्यात कुटुंबाप्रती असलेलं प्रेम दिसतंय…खरंच थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहा.”

दरम्यान, ‘दृश्यम ३’ स्क्रीनप्ले, स्मार्ट ट्विस्ट, दमदार कलाकार आणि जबरदस्त क्लायमॅक्सने परिपूर्ण असा सिनेमा असल्याचं प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत आहे. त्यातही ‘दृश्यम’ला लाँग वीकेंड मिळाल्यामुळे या तीन दिवसांत ‘दृश्यम ३’ किती कोटींचा गल्ला जमावणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.