Ajay Devgn Drishyam 3 The Conclusion Release Date : गोव्यातील पणजीमध्ये २ ऑक्टोबरला नेमकं काय झालं होतं, त्याचं रहस्य समोर येणार आहे. विजय साळगावकरचं गुपित उघड होणार की आणखी गुंता वाढत जाणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या हिंदी चित्रपट मालिकेतील तिसरा आणि शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या तिसऱ्या सिनेमाचं नाव जाहीर झालं असून हा ‘दृश्यम’ या सीरिजचा शेवटचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ (Drishyam : The Conclusion), असे नाव जाहीर केले गेले असून, हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

क्राइम व थ्रिलर असलेल्या ‘दृश्यम’ सिनेमाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सिनेमातील अनपेक्षित वळणं, गुपितं आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी विजयने विचारपूर्वक आखलेली योजना, यांमुळे या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘दृश्यम’चे दोन भाग प्रदर्शित झाले असून दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्यानंतर आता या गोष्टीचा शेवट नेमका कसा होता, याचा खुलासा ‘दृश्यम : द कन्क्लुजन’मध्ये होणार आहे. त्याबाबत अजय देवगणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘दृश्यम: द कन्क्लुजन’चे पोस्टर रिलीज

अजय देवगणने इन्स्टाग्रामवर ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ या सिनेमाचे एक पोस्टर शेअर केले असून, त्यामधून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्याता आली आहे. पोस्टरमध्ये फक्त अजय देवगणचा एक डोळा दाखवण्यात आल्याने सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यावर, ‘माझं सत्य आणि माझं जे काही बरोबर, ते फक्त माझं कुटुंब आहे,’ अशा आशयाचे वाक्य लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिलं गेलंय, ‘प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो… माझ्यासाठी माझं कुटुंबच सर्वस्व आहे.’

त्याचबरोबर अभिनेत्री तब्बूचे एक पोस्टर समोर आले आहे. यामध्ये तिच्या मीरा देशमुख ही प्रतिशोध घेणार असल्याचे दिसून आले आहे. तब्बूच्या पोस्टरवर लिहिलं, “यावेळी मला न्याय नाही तर बदला घ्यायचा आहे,” त्याचबरोबर नंदिनी साळगावकरच्या पोस्टरवर प्रत्येक कुटुंबाचे एक गुपित असतं, अशा आशयाचं कॅप्शन लिहिलं आहे.

‘दृश्यम: द कन्क्लुजन’ कधी होणार रिलीज?

‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हा सिनेमा २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या संपूर्ण चित्रपटाची कथा ही २ ऑक्टोबरवर आधारित असून, सिनेमामध्ये अनेकदा या तारखेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे २ ऑक्टोबर ही ‘दृश्यम’ सिनेमाची ओळख बनलेली आहे. आता या सीरिजचा तिसरा आणि शेवटचा सिनेमा २ ऑक्टोबर रोजीच प्रदर्शित होणार आहे. ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी आहे. तसेच ‘स्टार स्टुडिओ १८’ आणि ‘पॅनोरामा स्टुडिओज’ यांच्यासह आलोक जैन, अजित अंधारे, कुमार मंगत पाठक व अभिषेक पाठक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हत्येच्या सात वर्षांनंतरची गोष्ट येणार समोर

यापूर्वी ‘दृश्यम ३’चा टीझर रिलीज करण्यात आला होता. पोलीस महानिरीक्षक मीरा देशमुखचा मुलगा समीर देशमुखची हत्या होऊन सात वर्षे झाल्यानंतरची गोष्ट या तिसऱ्या भागामध्ये मांडण्यात येणार असल्याचे समोर आले होते. त्यामध्ये विजय साळगावकर म्हणतो, “प्रत्येकाच्या बाबतीत सत्य, खरं व योग्य हे वेगवेगळं असतं आणि माझ्यासाठी माझं कुटुंबच माझं सर्व सत्य आणि सर्वस्व आहे. गोष्ट अजून संपलेली नसून, शेवटचा भाग बाकी आहे.” दरम्यान, ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.