Drishyam 3 Jaideep Ahlawat Reacts Akshaye Khanna Replacement Controversy: ‘दृश्यम ३’मधून अचानक बाहेर पडल्यामुळे अभिनेता अक्षय खन्ना जोरदार चर्चेत आला होता. निर्माते कुमार मंगत पाठक यांनी ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षयला ‘दृश्यम ३’साठीचे मानधन वाढवून हवे होते आणि याच कारणामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचा दावा केला होता. या वादानंतर आता जयदीप अहलावत हा ट्रेलरमध्ये पोलिसांची भूमिका साकारताना दिसला. त्यामुळे जयदीप हा अक्षयची रिप्लेसमेंट असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत आता जयदीप अहलावतने स्पष्टपणे नकार देत त्यांचे मत व्यक्त केले आहे.

अजय देवगणच्या बहुचर्चित ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यामध्ये विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाविरोधात पोलिसांच्या हाती पुरावा लागल्याचे दाखविण्यात आले आहे. यावेळी सिनेमामध्ये प्रकाश राज व जयदीप अहलावत या दोन नवीन अभिनेत्यांची एन्ट्री झाल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विजय साळगावकरसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी ‘एसपी क्राईम ब्रँच राजवीर सिंग तोमर’ हे पात्र असणार आहे. ही भूमिका जयदीप अहलावतने साकारली असून, तो अक्षय खन्नांची रिप्लेसमेंट नसल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे.

अक्षय खन्ना यांनी साकारलेले पात्र हे आधीच्याच सिनेमात संपले – जयदीप

ट्रेलर लॉंच इव्हेंटमध्ये जयदीपने अक्षयबरोबर तुलना आणि काम करताना ताण न आल्याचे सांगितले आहे. तसेच त्याची ही भूमिका पूर्णपणे वेगळी असून, अक्षय खन्ना यांनी साकारलेले पात्र हे आधीच्याच सिनेमात संपल्याचे जयदीपने स्पष्ट केले. तसेच तिसऱ्या भागातील नवीन एसपी क्राईम ब्रॅंच हे पात्र पूर्णपणे वेगळं लिहिण्यात आलं असून, त्यासाठी विशेष मेहनत घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

जयदीप अहलावत म्हणाला, “जेव्हा मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली तेव्हा त्यामध्ये मी अक्षय खन्नाची जागा घेतोय, असं कुठेही लिहिलेलं नव्हतं. एका पात्राचा प्रवास संपून दुसऱ्या पात्राचा प्रवास सुरू झाला आहे. मला त्या भूमिकेचा (अक्षय खन्नाच्या भूमिकेचा) ताण घेऊन काहीच उपयोग होणार नव्हता. कारण- माझा प्रवास पूर्णपणे नवीन असणार आहे.”

Drishyam 3 Trailer Out Ajay Devgn as Vijay Salgaonkar with Tabu in Drishyam The Conclusion movie poster
अजय देवगणचा ‘दृश्यम : द कन्क्लुजन’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

पुढे तो म्हणाला, “माझ्या भूमिकेची ओळख वेगळी असून, त्याचे मीराबरोबरचे (तब्बूची भूमिका) नातंही वेगळं असणार आहे. माझ्या पात्राचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा असेल. त्यामुळे माझ्यावर काम करताना कोणताही ताण आलेला नव्हता. माझं पात्र दुसऱ्या कोणाची रिकामी झालेली जागा भरून काढण्यासाठी तयार केली गेलेली नाही, तर त्याचा स्वतःचा स्वतंत्र असा एक प्रवास आहे. लेखकांनी हे पात्र खूप चांगल्या पद्धतीनं लिहिलं आहे.”

‘दृश्यम : द कन्क्लुजन’ कधी होणार रिलीज?

‘दृश्यम : द कन्क्लुजन’ हा सिनेमा २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा दृश्यम या फ्रॅंचायजीमधील शेवटचा सिनेमा असल्याने साळगावकर कुटुंब पुन्हा एकदा या प्रकरणातून सुटणार की पोलिसांच्या हाती लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक पाठकने केले असून, पॅनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.