२०२६ मधील सर्वोत्तम क्राइम थ्रिलर चित्रपट ठरलेल्या ‘दृश्यम ३’ची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरूच आहे. अवघ्या ९ दिवसांत हा चित्रपट अजय देवगणच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. नवव्या दिवशीही चित्रपटाने जगभरात दमदार कामगिरी केली आहे. ‘दृश्यम ३’ने जगभरातील कमाईच्या बाबतीत ‘हनुमान अंश’चा विक्रम मोडला आहे. यासह हा चित्रपट २०२६ मध्ये जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. जाणून घेऊया, या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत किती कमाई केली आहे.

सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘दृश्यम ३’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ६२ कोटी, दुसऱ्या दिवशी ५३.५० कोटी, तिसऱ्या दिवशी ६१ कोटी आणि चौथ्या दिवशी २१ कोटी रुपयांची कमाई केली. पाचव्या दिवशी १९.५० कोटी, सहाव्या दिवशी १५.५० कोटी, तर सातव्या दिवशी १३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. अशा प्रकारे पहिल्या आठवड्यात चित्रपटाने २४५.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यानंतर आठव्या दिवशी १४.५० कोटी, तर नवव्या दिवशी २६.५० कोटी रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाने एकूण १८६.५० कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे.

‘दृश्यम ३’ने भारतात बॉक्स ऑफिसवर ३०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दहाव्या दिवशी रात्री १०.३० वाजेपर्यंत या चित्रपटाने २०.८० कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे चित्रपटाचं भारतातील एकूण नेट कलेक्शन ३०७.३० कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. दहाव्या दिवशी चित्रपटाची ऑक्युपन्सी ३० टक्के नोंदवण्यात आली.

‘दृश्यम ३’ची जगभरातील कमाई

‘दृश्यम ३’ने अवघ्या ९ दिवसांत जगभरात जवळपास ४५० कोटी रुपयांची कमाई केली होती. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, या चित्रपटाने परदेशात १०३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यामुळे चित्रपटाचं जगभरातील एकूण ग्रॉस कलेक्शन ४४६.८० कोटी रुपयांवर पोहोचलं होतं.

‘दृश्यम ३’ने ‘हनुमान अंश’चा विक्रम मोडला

नवव्या दिवसाच्या कमाईनंतर ‘दृश्यम ३’ने ‘हनुमान अंश’च्या जगभरातील कमाईचा विक्रम मोडला. कोईमोईच्या माहितीनुसार, ‘हनुमान अंश’ने जगभरात ४३१.७२ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा आकडा पार करत ‘दृश्यम ३’ने २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं.

२०२६ मधील जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या १० हिंदी चित्रपटांच्या यादीत ‘धुरंधर २’ने १,८५०.८५ कोटी रुपयांच्या कमाईसह पहिलं स्थान मिळवलं आहे. त्यानंतर ‘बॉर्डर २’ (४८५.३० कोटी रुपये), ‘दृश्यम ३’ (४४६.८० कोटी रुपये), ‘हनुमान अंश’ (४३१.७२ कोटी रुपये), ‘मिर्झापूर द मूव्ही’ (३३६.५१ कोटी रुपये), ‘भूत बंगला’ (२९२.६४ कोटी रुपये), ‘धमाल ४’ (२३६.४२ कोटी रुपये), ‘आवारापन २’ (२१७.६४ कोटी रुपये), ‘वेलकम टू द जंगल’ (१९६.१० कोटी रुपये) आणि ‘कॉकटेल २’ (१६६.२९ कोटी रुपये) या चित्रपटांचा समावेश आहे.