'दृश्यम'मधील गायतोंडेला धमक्यांचे, शिवीगाळ करणारे फोन कॉल्स; कमलेश सावंत यांनी सांगितला अनुभव | drishyam actor kamlesh sawant aka gaitonde shares his experience with audience after film release | Loksatta

‘दृश्यम’मधील गायतोंडेला धमक्यांचे, शिवीगाळ करणारे फोन कॉल्स; कमलेश सावंत यांनी सांगितला अनुभव

पहिल्या भागातही कमलेश यांचं काम खूप पसंत केलं गेलं

‘दृश्यम’मधील गायतोंडेला धमक्यांचे, शिवीगाळ करणारे फोन कॉल्स; कमलेश सावंत यांनी सांगितला अनुभव
अभिनेता कमलेश सावंत (फोटो : सोशल मीडिया)

अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चांगलाच सुपरहीट ठरला. चित्रपटाने आत्तापर्यंत १९० कोटीचा आकडा पार केला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाचा उदंड प्रतिसाद दिला आहे. केवळ मुख्य कलाकारच नव्हे तर सहाय्यक कलाकारांची कामंदेखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. यापैकी चित्रपटातील एक असं पात्र ज्याला पाहून लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते ते म्हणजे पोलिस अधिकारी गायतोंडेचं.

हे पात्र साकारलंय मराठी अभिनेता कमलेश सावंत यांनी. कमलेश यांनी त्यांचं काम अत्यंत चोख केलं आहे त्यामुळेच आज प्रेक्षक या पात्रावर एवढे भडकलेले आपल्याला दिसत आहेत. पहिल्या भागातही कमलेश यांचं काम खूप पसंत केलं गेलं. पहिल्या भागातही त्यांचं काम बघून प्रेक्षकांनी दात ओठ खाल्ले होते. याच पात्राबद्दल आणि त्यांनंतर आलेले अनुभवांबद्दल कमलेश सावंत यांनी खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “२ जोडी कपडे, गोठलेले हात पाय…” अभिनेत्री ते साधू या खडतर प्रवासाबद्दल अनू अगरवालचा खुलासा

‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना कमलेश यांनी त्यांच्या पात्रामुळे प्रेक्षक किती बेचैन आणि अस्वस्थ झाले याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. कमलेश म्हणाले, “साळगांवकर कुटुंबाला मारहाण केल्याने प्रेक्षक माझ्यावर प्रचंड भडकले होते, काही लोकांनी मला निर्दयी म्हणून नाव ठेवलं, काहींनी माझ्या कामाची प्रशंसा केली. झी टॉकीजने मध्यंतरी यासंदर्भात एक पोस्टदेखील केली होती की, जर तुम्हाला गायतोंडे भेटला खऱ्या आयुष्यात तर तुम्ही काय कराल? यावर प्रेक्षकांनी प्रथम माझ्या कामाची तारीफ केली नंतर एकाने कॉमेंट केली होती की, बाहेर भेटलास तर कुत्र्यासारखा मारेन. या कॉमेंट वाचून मलाच माझ्या कामाची पोचपावती मिळाली.”

आणखी वाचा : सुश्मिता सेनच्या ‘आर्या’चा पुढचा सीझन लवकरच येणार भेटीला; सिकंदर खेरने पोस्ट करत दिली माहिती

इतकंच नाही तर कमलेश यांना धमक्या देणारे फोन्सही येऊन गेले. याबाबत खुलासा करताना कमलेश म्हणाले, “मी सहसा अनोळखी लोकांचे फोन कॉल उचलत नाही. एके दिवशी मला एका व्यक्तीचा रात्री फोन आला. ती व्यक्ती फोनवर मला आई बहिणीवरून शिवीगाळ करत होती. मी शिव्या देणं योग्य नाही त्यामुळे मी त्याला ब्लॉक केलं. त्यानंतर मला असे ५ कॉल्स आले. हीच खरी माझ्या कामाची पोचपावती आहे असं मी मानतो. निळू फुले यांच्यावरसुद्धा अशी बरीच टीका झालेली आहे. त्यामुळे हे एक प्रकारचं प्रेक्षकांचं प्रेमच आहे.” दृश्यम २ चांगलाच गाजला आहे, शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी ‘दृश्यम ३’चेही संकेत दिले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 08:56 IST
Next Story
“मी सुशांत सिंहकडून…” सारा अली खानने जागवल्या ‘केदारनाथ’च्या आठवणी