Kamlesh Sawant opens up about choosing roles over money: ‘दृश्यम सिनेमातील प्रत्येक भूमिकेचे महत्त्व वेगळे आहे. प्रत्येक पात्राचे वेगळेपण आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा भावला. दृश्यमच्या तीनही भागांना उत्तम प्रतिसाद मिळाला. या सिनेमात मराठमोळे अभिनेते कमलेश सावंत यांनी साकारलेली लक्ष्मीकांत गायतोंडे ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांच्या डायलॉगची चर्चा झाली.
“मी कधीच पैशांकडे बघितलं नाही”
आता मात्र कमलेश सावंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आहेत. त्यांनी राजश्री मराठीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारलं की आर्थिक स्थैर्यासाठी आपण समोर येईल त्या कामाला होकार देतो, तुमच्या कारकिर्दीत फक्त उत्तम पैसे मिळत आहेत, म्हणून कधी भूमिका केली आहे का? यावर कमलेश सावंत म्हणाले, “नाही, असं कधी केलं नाही. माझ्या गुरूंनी एक गोष्ट सांगितली आहे की काम करताना खोली बघ, त्याची लांबी बघू नको. तर मला जे काही मिळालं त्याची खोली बघितली, त्यामुळे मला एकच सीन करायला मिळाला आहे. मला एकाच सीनचा सिनेमा मिळाला आहे, असा मी विचार कधीच केला नाही. त्या सीनला मी कसा मोठा करू शकेन हा विचार मी करतो.”
पुढे ते म्हणाले, “मी ज्या क्षेत्रात काम करतो ते बिझनेस क्षेत्र आहे. मार्केटिंग एरिया आहे. जे दिसतं ते विकतं. दिसणं बंद झालं, दुसऱ्या क्षणाला मायबाप रसिक प्रेक्षक विसरून जातात. मोठमोठे कलाकार आहेत, जे दिसायचे बंद झाले की गायब झाले. कारण- प्रत्येक दशकानुसार प्रेक्षक वेगवेगळ्या रुचीचा, वेगवेगळ्या चवीचा येतो, त्यामुळे त्या-त्या वेळेला ते ते देणं हे आमचं कर्तव्य आहे, त्यामुळे दिसत राहणं आणि आपणही त्या प्रमाणे बदलत राहणं हे आपल्या हातात आहे. कारण-तुम्ही कुठली गोष्ट करताय, ती प्रामाणिकपणे आणि त्या पद्धतीने केली पाहिजे.”
ते असेही म्हणाले, “जर गोष्टी बदलत असतील तर आपणही बदलत गेलं पाहिजे. अपग्रेड झाला नाहीत तर तुम्ही संपणार. तुम्हाला मायबाप रसिक प्रेक्षक उभं करणार नाहीत असं मला वाटतं, त्यामुळे मी असा कधी विचार केला नाही, तर खूप पैसे आहेत तर करूयात. मी कधीच पैशांकडे बघितलं नाही. मी फक्त कामाकडे बघितलं आहे. काम आलं की मी करतो. मला छोटी भूमिका आहे असा मी कधीच विचार केला नाही. भूमिका ही भूमिका असते, ती निभावण्याचं काम कलाकाराने मोठेपणाने करायला हवं. कारण कोणतीच भूमिका छोटी किंवा मोठी नसते. प्रत्येक जण, म्हणजे स्पॉटबॉयही, भलेही तो पडद्यावर दिसत नसला तरीही तो तितकाच प्रोजेक्टसाठी महत्त्वाचा आहे.”
दरम्यान, आता ‘दृश्यम: द कनक्लुजन’नंतर कमलेश सावंत कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
