Kamlesh Sawant Family Struggle: ‘दृश्यम’ फेम मराठमोळे कमलेश सावंत यांनी त्यांच्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘स्क्रीन’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी, आई-वडिलांचा त्याग आणि नाटकांमधील इअनेक वर्षांच्या संघर्षाने त्यांना एक माणूस म्हणून कसं घडवलं याबद्दल सांगितलं. आता कमलेश सावंत चांगलं कमावत असले तरी त्यांनी अनेक मध्यमवर्गीय सवयी अजूनही जपून ठेवल्या आहेत.

आपल्या व्यक्तिमत्त्वावरील वडिलांच्या प्रभावाबद्दल कमलेश सावंत म्हणाले, “माझे वडील रेल्वेत कामाला होते. ते स्पोर्ट्स सेक्रेटरी होते. ते बॉडीबिल्डर होते. ते ड्रील एक्सरसाइजमध्ये भाग घ्यायचे. ते खिळ्यांवर झोपायचे आणि त्यांच्या छातीवर विटा ठेवल्या जायच्या, त्या विटा कोणीतरी हातोड्याने मारून फोडायचा. ते सुयांवर उभे राहायचे आणि दुसरा माणूस त्यांच्या हातावर उभा राहायचा. ते या गोष्टी करायचे.”

कधीच ब्रेड-बटर मिळालं नाही- कमलेश सावंत

कमलेश सावंत बालपणाबद्दल म्हणाले, “आम्हाला कधीच ब्रेड-बटर खायला मिळाले नाही. आम्हाला नेहमी मोड आलेली कडधान्ये आणि चपाती मिळायची. चवीसाठी थोडे दूध, अंडी व थोडी साखर मिळायची. त्या जीवनशैलीमुळेच मी असा आहे.”

कमलेश सावंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत, त्यामुळे रोजच्या आयुष्यात आर्थिक अडचणी होत्याच. “माझी आई फक्त एकच साडी नेसायची. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय, माझे नातेवाईकही आमच्यासोबत राहायचे. माझ्या वडिलांचा पगार सर्वांसाठी आणि आमच्या शिक्षणासाठी पुरेसा नव्हता. आम्ही तीन बहिणी, एक मोठा भाऊ आणि मी असे पाच भावंडं होतो. प्रत्येकाला सगळं समान मिळालं पाहिजे, असा प्रयत्न वडील करायचे,” असं कमलेश सावंत म्हणाले.

Drishyam Actor Kamlesh Sawant 1
कमलेश सावंत (फोटो- इन्स्टाग्राम)

मासे खाण्याची मध्यमवर्गीय सवय

“मी अजूनही काही मध्यमवर्गीय सवयी पाळतो. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा आमच्याकडे मासे बनवले जायचे, तेव्हा प्रत्येकाला दुपारी आणि रात्रीच्या जेवणासाठी माशाचा एकच तुकडा मिळायचा. जर कोणी दुपारी माशाचे दोन तुकडे खाल्ले, तर त्या व्यक्तीला रात्रीच्या जेवणात मासा मिळायचा नाही. आता मी खूप कमावतो. हॉटेलचा खर्च प्रॉडक्शन हाऊस उचलत असले तरीही मी माशाचा एकच तुकडा खातो. मला लहानपणापासून ही सवय आहे आणि ती आता बदलणार नाही,” असं कमलेश सावंत यांनी नमूद केलं.

लहानपणी आर्थिक विवंचनेत दिवस काढणाऱ्या कमलेश सावंत यांनी सांगितलं की घरात जे काही खायला असेल, ते खाऊन ते भूक भागवायचे. “लहानपणी मला खूप भूक लागली की मी एक केळ आणायचो, ते चपातीत गुंडाळून खायचो. कधीकधी मी चपातीमध्ये पारले-जी बिस्किटं भरून खायचो. अशा प्रकारे आम्ही तडजोड करायला शिकत मोठे झालो,” असं कमलेश सावंत यांनी सांगितलं.

Drishyam Actor Kamlesh Sawant 2
कमलेश सावंत (फोटो- इन्स्टाग्राम)

अदानी-अंबानीसारखी एंट्री, पण बाहेर पडताना कमलेश सावंत

आताच्या काळात सामान्य असलेल्या सेलिब्रेशनबद्दल कमलेश यांना फारशी माहिती नव्हती. कॉलेजमध्ये गेल्यानंतरच त्यांना वाढदिवसाचा केक आणि ग्रीटिंग कार्ड्सबद्दल समजलं. “मला वाढदिवसाला केक कापण्याबद्दल माहिती नव्हती. मला कॉलेजमध्ये गेल्यावर हे समजलं. वर्षातून एकदा, १२ जूनला माझ्या वाढदिवशी आई मला १० रुपये द्यायची आणि मला अंबानी किंवा अदानी असल्यासारखं वाटायचं. त्या ५-५ रुपयांत मी कधीतरी हॉटेलमध्ये जाऊन मेदू वडाची प्लेट आणि आईस्क्रीम खाऊ शकत होतो. मी हॉटेलमध्ये अंबानी किंवा अदानींसारखा प्रवेश करायचो, पण बाहेर पडताना कमलेश सावंत म्हणूनच बाहेर पडायचो.

Drishyam Actor Kamlesh Sawant 3
कमलेश सावंत (फोटो- इन्स्टाग्राम)

चाळीत राहायचे कमलेश सावंत

वडिलांच्या निधनानंतर कमलेश आणि त्यांची आई चाळीतील घरातच राहत होते, तर त्यांचा भाऊ पहिल्या मजल्यावर राहत होता. मोजक्याच उत्पन्नात ते खर्च भागवायचे. “माझे वडील वारल्यानंतर मी आणि माझी आई खालच्या मजल्यावरील चाळीत राहायचो, तर माझा भाऊ पहिल्या मजल्यावर राहायचा. तिथे फारसा खर्च नसायचा. आम्ही १०,००० ते १५,००० रुपयांत आमचा महिन्याचा खर्च भागवायचो, कारण आम्ही रेशन दुकानातून २ रुपये किलोने तांदूळ आणून खायचो. आईला वडिलांचे पेन्शन मिळायचे आणि माझी भावंडे दर महिन्याला खर्चासाठी आईला पैसे द्यायची.”