मराठी मनोरंजनविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार आजवर असंख्य सुपरहिट हिंदी सिनेमांमध्ये झळकले आहेत. त्यांच्या कामाचं बॉलीवूडच्या सुपरस्टार अभिनेत्यांकडून सुद्धा करण्यात आलं आहे. रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ फ्रँचायझीमध्ये याशिवाय ‘दृश्यम’च्या दोन्ही भागांत प्रेक्षकांना मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. ‘दृश्यम’मध्ये कमलेश सावंत यांनी साकारलेला गायतोंडे प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला. पहिला आणि दुसरा भाग गाजवल्यावर आता कमलेश सावंत लवकरच ‘दृश्यम’च्या तिसऱ्या भागातही झळकणार आहेत.
नुकत्याच दिलेल्या ‘मित्र म्हणे’च्या मुलाखतीत कमलेश सावंत यांनी अजय देवगण यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ते म्हणाले, “अजय देवगण सर म्हणजे खूपच गोड माणूस…आम्ही पहिला दृश्यम शूट केला.. त्याला आता खूप वर्ष झाली. पहिल्या दृश्यमनंतर अनेक वर्षांनी याचा दुसरा भाग आला. मी एकदम सुरुवातीचा किस्सा सांगतो… आता मी काळाचौकीचा असल्याने सेटवर गेल्यावर हाय-हॅलो…गुड मॉर्निंग, झप्पी वगैरे देणं या सगळ्याची मला अजिबात सवय नाहीये. आम्ही सेटवर येतो..काम करतो आणि निघून जातो. मला ती आधीपासून सवय नाहीये.”
“पण मग एके दिवशी अजय सर स्वत:हून माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘कमलेश तू खाकीमध्ये होतास ना? मला खूप चांगलं आठवतंय…आणि माझे सगळे मित्र मला विचारत आहेत की, गायतोंडेची भूमिका कोण करतंय? तुला माहितीये ना ही भूमिका किती महत्त्वाची आहे?’ मी यावर त्यांना बोललो होतो, सर मी नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. मी माझे शंभर टक्के देईन… आता बघुयात कसं होतंय.”
“त्यानंतर मग रजत कपूर सर आले…त्यांनी मला विचारलं, दृश्यमचं मल्याळम व्हर्जन पाहिलंय? मी म्हटलं नाही…तामिळमध्येही पाहिला नव्हता आणि तेलुगू भाषेतला ‘दृश्यम’ सुद्धा मी पाहिला नव्हता. मग ते मला म्हणाले…बरं झालं आता तू एकदम फ्रेशली ही भूमिका करशील. म्हणजे त्यावेळी ही भूमिका किती महत्त्वाची आहे याचीही मला जाणीव झाली.”
दरम्यान, ‘दृश्यम’चा तिसरा भाग येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या तिसऱ्या भागाचा स्क्रीनप्ले मल्याळम चित्रपटासारखा नसेल. त्यामुळे आता या तिसऱ्या भागात नेमकं काय पाहायला मिळेल? याबद्दल प्रेक्षकांच्या मनातही उत्सुकता निर्माण झालेली आहे. यामध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असतील.
