Drishyam Movie : “हम 2 अक्टूबर को पणजी गए थे, स्वामी चिन्मयानंद जी के सत्संग में…वहाँ हमने पावभाजी खाई थी!” हा ‘दृश्यम’ चित्रपटातील आयकॉनिक डायलॉग सर्वत्र तुफान लोकप्रिय आहे. गेल्या १०-११ वर्षांत ‘दृश्यम’चे एकूण तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि या तिन्ही भागांमध्ये विजय साळगांवकर कुटुंबीयांचं पणजीला जाणं, तिथे सत्संगला उपस्थित राहणं…त्यानंतर चित्रपट पाहून पावभाजी खाणं हा संपूर्ण प्रवास महत्त्वाचा आहे. त्यामुळे ‘दृश्यम’ सिनेमा आणि ‘हमने पावभाजी खाई थी’ या डायलॉगचं एक वेगळं कनेक्शन तयार झालं आहे.
पण, तुम्हाला माहितीये का मूळ ‘दृश्यम’ चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये पावभाजीऐवजी वेगळाच पदार्थ होता. दृश्यमच्या पहिल्या भागाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. त्यामुळे, बालकलाकार मृणाल जाधवच्या अल्लड मागणीपोटी त्यांनीच पावभाजीचा बदल केला होता. नाहीतर मूळ, स्क्रिप्टमध्ये नॉनव्हेज बिर्याणी असल्याचं मृणालने ‘लोकशाही फ्रेंडली’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
मृणाल म्हणाली, “पावभाजी आणि ‘दृश्यम’ सिनेमाचं एक वेगळं कनेक्शन तयार झालेलं आहे. पण, तुम्हाला माहितीये का? सिनेमाच्या पहिल्या भागाच्या मूळ स्क्रिप्टमध्ये पावभाजी हा पदार्थ नव्हताच. पावभाजीच्या ऐवजी हमने ‘बिर्याणी’ खाई थी! असा तो डायलॉग होता. नॉनव्हेज बिर्याणी होती…पण, मी तेव्हा लहान होते…मला बिर्याणी वगैरे आवडत नव्हती. अर्थात, No हेट फॉर बिर्याणी लव्हर्स…पण, मला खरंच बिर्याणी इतकी आवडत नाही.”
“त्यामुळे निशी सरांना मी अगदी अल्लडपणे बोलले होते, मला बिर्याणी आवडत नाही. मला पावभाजी खूप आवडते, माझ्यासाठी पावभाजी ठेवा. निशी सरांनी सुद्धा लगेच ऐकलं, ते म्हणाले पावभाजीच खायचीये ना…आपण ठेऊयात. आता मलाही नव्हतं वाटलं ‘दृश्यम’ आणि पावभाजीचं कनेक्शन इतकं चर्चेत येईल. त्यामुळे आता त्या डायलॉगची लोकप्रियता पाहून मलाही खूप छान वाटतं.” असं मृणालने सांगितलं.
