बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या लोकप्रिय ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा तिसरा आणि शेवटचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या फ्रँचायझीची सुरुवात २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटापासून झाली. चित्रपटाच्या कथेबरोबर कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात एक असं पात्र होतं, ज्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण कथेला वेगळं वळण मिळतं. हे पात्र होतं सॅमचं, ज्याची भूमिका अभिनेता ऋषभ चड्ढा याने साकारली होती.पण अनेकांना माहीत नसेल की सॅम म्हणजेच ऋषभ चड्ढा आता काय करतो कारण अभिनेता सध्या चित्रपटांपासून दूर आहे.

ऋषभने तब्बू आणि रजत कपूर यांच्या मुलाची, म्हणजेच समीर देशमुख ऊर्फ सॅमची भूमिका केली होती. चित्रपटात त्याची भूमिका फार मोठी नसली, तरी कथानकाच्या दृष्टीने ती अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळेच आता ‘दृश्यम’मधील सॅम म्हणजेच ऋषभ चड्ढा सध्या कुठे आहे आणि काय करतोय, हे जाणून घेऊया.

कोण आहे ऋषभ चड्ढा?

ऋषभ चड्ढाचा जन्म १९९४ मध्ये मुंबईत झाला. त्याने २००७ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांसह त्याने टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ‘दृश्यम’पूर्वी ऋषभ सोनम कपूर आणि फवाद खान यांच्या ‘खूबसूरत’ चित्रपटात दिसला होता. याशिवाय त्याने ‘लुप्त’ या चित्रपटातही काम केलं आहे.ऋषभ चड्ढा टीव्हीवरील अनेक लोकप्रिय शोजचा भागही राहिला आहे. तो ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘द सूट लाइफ ऑफ करण अँड कबीर’ आणि ‘आदत से मजबूर’ यांसारख्या शोजमध्ये झळकला आहे. याशिवाय त्याने ‘डिवोर्स के लिए कुछ भी करेगा’ या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकाही साकारली होती.

‘दृश्यम’मधून मिळाली खरी ओळख

ऋषभ चड्ढाला सर्वाधिक ओळख ‘दृश्यम’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्याने सॅम म्हणजेच समीर देशमुखची भूमिका साकारली होती. ही भूमिका त्याच्या करिअरसाठी खूप खास ठरली. चित्रपटात सॅमच्या मृत्यूनंतरच कथेला नवं वळण मिळतं आणि त्याच्या हत्येमागचं सत्य लपवण्याभोवती पुढची संपूर्ण कथा फिरते.

आता काय करतोय ऋषभ चड्ढा?

‘दृश्यम’नंतरही ऋषभ काही प्रोजेक्ट्समध्ये दिसला, मात्र आता तो चित्रपटांपासून दूर आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ऋषभने गेल्या दोन वर्षांपासून कोणताही नवीन प्रोजेक्ट साइन केलेला नाही. आता कॅमेऱ्यापासून दूर जात त्याने लाइव्ह ऑडियन्समध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.सध्या ऋषभ चड्ढा लाइव्ह स्टोरीटेलिंग आणि शायरी-कवितांचे इव्हेंट्स करत आहे. त्याचा ‘मॉडर्न मजनू’ हा शोदेखील चर्चेत आहे. या लाइव्ह शोजच्या माध्यमातून तो थेट प्रेक्षकांशी जोडला जातो. त्याच्या शोची तिकिटं वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सद्वारे बुक करता येतात.

‘दृश्यम’मध्ये काय होतं सॅमचं पात्र?

‘दृश्यम’मध्ये सॅम एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा असतो आणि आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा गैरफायदा घेतो. कॉलेजच्या पिकनिकदरम्यान तो अंजूबरोबर गैरवर्तन करतो आणि तिचा व्हिडीओ बनवतो. त्यानंतर तो हा व्हिडीओ लीक करण्याची धमकी अंजूला देतो.कथेला वेगळं वळण तेव्हा मिळतं, जेव्हा सॅम साळगावकर कुटुंबाच्या घरी पोहोचतो. तिथे अंजू आणि सॅममधील वाद वाढतो आणि रागाच्या भरात अंजू त्याच्या डोक्यात रॉड मारते. यामुळे सॅमचा मृत्यू होतो. त्यानंतर विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सॅमचा मृतदेह लपवतो आणि तिथून सुरू होते चित्रपटाची खरी गोष्ट.