Drunk Raj Kapoor called Dev Anand at 2 am: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वश्रेष्ठ निर्माते म्हणून राज कपूर यांची ओळख होती. त्यांचा एक कौतुकाचा शब्द म्हणजे अनेक कलाकारांसाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असे. असाच एक क्षण अभिनेते-लेखक-दिग्दर्शक विजय आनंद यांच्या आयुष्यातही आला. विजय आनंद, जे गोल्डी आनंद म्हणून लोकप्रिय होते, ते दिग्गज अभिनेते देव आनंद यांचे धाकटे भाऊ होते. राज कपूर यांनी विजय आनंद यांच्या पाठीमागे भरभरून कौतुक केले असले तरी प्रत्यक्षात त्यांना कधीही ओळखही दाखवली नाही, असे सांगितले जाते.
द गाईड हा विजय आनंद यांचा पाचवा चित्रपट होता. हा चित्रपट आर. के. नारायण यांच्या १ ‘द गाइड’ या कादंबरीवर आधारित होता. जेव्हा हा चित्रपट इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्या चित्रपटाला अपयशाला सामोरे जावे लागले.मात्र जेव्हा हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला, त्यावेळी हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरला होता.
देव आनंद यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहकारी मोहन चुरीवाला यांनी विकी लालवाणीच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विजय आनंद यांनी त्यांना राज कपूर यांच्याबद्दल काय सांगितले होते, याबद्दल खुलासा केला.
“तेव्हा राज कपूर असुरक्षित…”
ते म्हणाले, “गोल्डी साहेबांनी मला ही गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते की, सर्वसामान्य माणसांसाठी, जे चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत, त्यांच्यासाठी राज कपूर म्हणजे देव आहेत. पण जेव्हा चित्रपटसृष्टीतील लोकांशी संवाद साधण्याची वेळ येते, तेव्हा राज कपूर असुरक्षित वाटतात.”
मोहन चुरीवाला यांनी पुढे सांगितले की रात्री साधारण २ वाजता देव आनंद यांना राज कपूर यांचा फोन आला. घरातील नोकराने फोन उचलला. देव आनंद यांच्याशीच बोलायचे आहे, असे राज कपूर यांनी सांगितले. तसेच देव आनंद स्वत: बोलले नाहीत तर घरी येईन असेही सांगितले. सुरुवातीला देव आनंद त्रासले होते. पण ते राज कपूर यांच्याशी बोलले. तेव्हा राज कपूर यांनी सांगितले की मला लगेच गाइड हा चित्रपट पाहायचा आहे.
ते पुढे म्हणाले, “देव आनंद यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रपटाची प्रिंट पाठवतो असे सांगितले होते. पण राज कपूर यांनी तो चित्रपट लगेचच पाहण्याचा आग्रह धरला. ते त्या वेळी नशेत असल्याचे सांगितले जाते. अखेर देव आनंद यांनी होकार दिला आणि परत झोपायला गेले.”
“ते फोनवर रडत…”
“पंधरा मिनिटांनंतर राज कपूर यांनी पुन्हा फोन करून प्रिंट पाठवली आहे का, असे विचारले. सकाळी सहा वाजता चित्रपट पाहून झाल्यानंतर राज कपूर यांनी पुन्हा देव आनंद यांना फोन केला. चित्रपटाचे तसेच विजय आनंद यांचे भरभरून कौतुक केले. देव आनंद यांना ते म्हणाले की तुला असा प्रतिभावान भाऊ लाभला आहे, हे तुझे भाग्य आहे. ते फोनवर रडत होते. त्या रात्री राज कपूर यांनी सतत फोन केल्यामुळे देव आनंद सुरुवातीला चिडले होते. पण राज कपूर यांनी एखाद्या चित्रपटाचे कौतुक करणे म्हणजे दिग्दर्शक आणि निर्मात्यासाठी मोठे यश मानले जात असल्याने त्यांना नंतर खूप बरे वाटले.”
“या घटनेच्या थोड्याच काळानंतर एका कार्यक्रमात राज कपूर उपस्थित होते. त्यावेळी देव आनंद यांनी विजय आनंद यांना खास राज कपूर यांना भेटण्यासाठी पाठवले. मात्र, राज कपूर यांनी त्यांना ओळख दाखविली नाही. विजय यांनी स्वतःची ओळख करून दिली. असेही सांगितले की मी चित्रपट बनवतो. नुकतीच गाईड चित्रपटाची प्रिंट तुम्हाला पाठवली होती.त्यावेळी राज कपूर म्हणालेले की ठीक आहे. मी तो चित्रपट पाहीन.”
मोहन चुरीवाला म्हणाले,”राज कपूर यांचे ते बोलणे ऐकल्यानंतर विजय आनंद अपमान झाल्यासारखे वाटले होते. मात्र देव आनंद यांनी राज कपूर त्यावेळी वेगळ्या मूडमध्ये असतील, असे सांगून विजय आनंद यांची समजूत काढली. मात्र असाच प्रकार पुन्हा एकदा विजय आनंद यांच्याबरोबर घडला. राज कपूर यांनी विजय आनंद यांची बहीण बोनी आनंद यांच्यासमोर विजय आनंद यांचे कौतुक केले. पुन्हा एकदा विजय आनंद त्यांच्यासमोर गेले तेव्हा राज कपूर यांनी ओळख दाखविली नाही”, अशी आठवण विजय आनंद यांनी सांगितल्याचे मोहन चुरीवाला यांनी सांगितले.

