Rajesh Khanna and Dimple Kapadia: राजेश खन्ना जितके त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आले, तितकेच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले. त्यांनी १६ वर्षीय डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केले. तेव्हा त्यांचे वय ३१ वर्ष होते. त्यावेळी ते बॉलीवूडचे सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. डिंपल कपाडियांनी त्यांचा पदार्पणाचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राजेश खन्नांशी लग्न केले. लग्नानंतर राजेश खन्नांनी डिंपल यांनी चित्रपटांत काम करू नये, असे सांगितले. त्यामुळे त्यांचे करिअर सुरू होण्याआधीच संपुष्टात आले.

डिंपल कपाडिया व राजेश खन्नांचे लग्न आणि त्यांच्या नात्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. लग्नानंतर नऊ वर्षांनी डिंपल कपाडियांनी त्यांच्या दोन मुलींसह राजेश खन्नांचे घर सोडले आणि त्यांनी पुन्हा करिअरला सुरुवात केली. त्यांच्या लग्नात अनेक समस्या होत्या. स्टारडम संपुष्टात येत असल्याने राजेश खन्नांचे वागणे बदलत होते. ते प्रमाणाबाहेर चिडचिड करीत असत. लग्नाबाहेरही त्यांचे संबंध होते. एका मुलाखतीत डिंपल कपाडियांनी हा सगळ्यात त्रासदायक काळ असल्याचे वक्तव्य केले होते.

“तो काळ खूप त्रासदायक…”

१९९४ ला डिंपल कपाडियांनी प्रीतीश नंदी यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या राजेश खन्नांबद्दल म्हणालेल्या, “मला वाटतं आम्ही दोघं खूप वेगळ्या स्वभावाचे लोक होतो आणि कदाचित त्या काळी मी खूप लहान होते. सुपरस्टार असलेल्या या माणसाबरोबर नेमकं काय घडत होतं हे मला समजत नव्हतं. खरे तर मला स्टार्स आणि त्यांच्या वागण्याच्या पद्धती कधीच समजल्या नाहीत. कारण- मी स्वतः तशी नाही. त्यामुळे ते समजून घेणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. तो काळ खूप त्रासदायक होता.”

राजेश खन्ना यांनी १९९० ला ‘मूव्ही मॅगझिन’ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी एकदा दारूच्या नशेत काय केले होते, याबद्दल सांगितले होते. ते म्हणालेले, “माझे सलग सात चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते आणि त्याचे मला वाईट वाटत होते. मी खूप दारू प्यायलो होतो. रात्री ३ वाजता मी घराच्या टेरेसवर एकटाच होतो. मी इतका दारूच्या नशेत होतो की, माझा स्वत:वरील ताबा सुटला. मी मोठ्याने ओरडत म्हणालो की, देवा, इतकी कठीण परीक्षा घेऊ नकोस की, आम्ही तुझ्या अस्तित्वालाच नाकारू. माझा आवाज ऐकून डिंपल व इतर स्टाफ पळत वर आले. त्यांना वाटले की, मी वेडा झालो आहे. मी इतकं यश पाहिलं होतं की, अपयश पचवणं मला कठीण झालं होतं.”

जेव्हा डिंपल कपाडिया व राजेश खन्ना वेगळे झाले. तेव्हा राजेश खन्ना हे त्यांची सहअभिनेत्री टीना मुनीम यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, हे नाते फार कमी काळ टिकले. जरी राजेश खन्ना व डिंपल कपाडिया वेगळे झाले असले तरी त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही.

१९९४ ला एका मुलाखतीत अभिनेत्रीला जेव्हा पुन्हा लग्न करण्याबाबत विचारले. तेव्हा त्यांनी, “हो. मला लग्न करण्याची इच्छा आहे. माझ्या मनाप्रमाणे मला जगण्याची खूप सवय झाली आहे, त्यामुळे मला माहीत नाही की, मी कशी जुळवून घेईन. पण, मला पुन्हा लग्न करायला नक्कीच आवडेल”, असे उत्तर दिले होते.