Eetha Movie Teaser : कलेवर प्रेम असणं म्हणजे काय हे आपल्याला ‘ईठा’चा २ मिनिट ३ सेकंदाचा टीझर पाहून लक्षात येतं. “पान में पान चखना हो तो मीठा, और तूफान को नाचते देखना हो तो ईठा” टीझरमधल्या या लक्षवेधी टॅगलाइनवरूनच या सिनेमाचा संपूर्ण आशय लक्षात येतो. ‘ईठा’ सिनेमा महाराष्ट्राच्या लोककलेचा सुवर्णकाळ घडवणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. विठाबाईंची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर साकारणार आहे.

विठाबाईंची कलेवरील निष्ठा वाखाणण्याजोगी होती. एकदा एका प्रयोगादरम्यान, ९ महिन्यांची गरोदर असताना… प्रसूती वेदना होत असतानाही त्यांनी पडद्यामागे जाऊन बाळाला जन्म दिला. त्यानंतर काही मिनिटांतच त्या पुन्हा रंगमंचावर आल्या आणि त्यांनी आपली कला सादर केली. त्यांची ही संघर्षगाथा प्रेक्षकांना ‘ईठा’ सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळेल.

‘ईठा’ सिनेमाचा जबरदस्त टीझर आता सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘ईठा’च्या टीझरची सर्वत्र तुफान चर्चा रंगली होती. ‘कॉकटेल २’ चित्रपटासह ‘ईठा’चा टीझर रिलीज करण्यात आला होता.

‘ईठा’च्या २ मिनिट ३ सेकंदाच्या टीझरचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. विशेषत: श्रद्धा कपूरच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. या सिनेमाला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. याशिवाय लोकप्रिय मराठी लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन ‘ईठा’ चित्रपटाचा लेखक आहे. तर, लक्ष्मण उतेकरांनी ‘ईठा’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

यापूर्वी, लक्ष्मण उतेकरांच्या ‘छावा’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून यश मिळालं होतं. आता त्यांचा ‘ईठा’ सिनेमा येत्या २८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये श्रद्धा कपूरसह रणदीप हुड्डा, नाना पाटेकर, अनंत जोशी, सिद्धार्थ जाधव यांसारख्या दमदार कलाकारांची मांदियाळी आहे.

नेटकऱ्यांनी ‘ईठा’च्या टीझरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “श्रद्धाला या भूमिकेसाठी नॅशनल अवॉर्ड मिळेल”, “नॅशनल अवॉर्ड for श्रद्धा”, “मॅडडॉक+श्रद्धा =ब्लॉकबस्टर”, “कमाल अभिनय”, “श्रद्धा कपूरने कमाल अभिनय केलाय”, “अजय अतुल आहेत…अजून काय हवं”, “श्रद्धा कपूर दिवसेंदिवस सगळ्या उत्तम भूमिका साकारतेय”, “लक्ष्मण उतेकर तुम्हाला सॅल्युट”, “हा सिनेमा १००० कोटींची कमाई करेल” अशा प्रतिक्रिया या टीझरवर आल्या आहेत.

दरम्यान, २८ ऑगस्टला ‘ईठा’ सिनेमा संपूर्ण जगभरात प्रदर्शित होईल. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष असेल.