Ekta Kapoor ALTT OTT Controversy: एकता कपूरने गेल्या काही वर्षांत इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने निर्मिती क्षेत्रात प्रबळ स्थान निर्माण केले आहे. टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांची निर्मिती तिच्या कंपनीने केली आहे. एकता कपूर ही लोकप्रिय बॉलीवूड अभिनेते जितेंद्र कपूर यांची मुलगी आहे.
एकताने जेव्हा ALTT हा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केला तेव्हा ती चर्चेत आली होती, कारण या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेंट हा वयाची १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या प्रेक्षकांसाठी होता. बोल्ड कंटेंटसाठी हा प्लॅटफॉर्म ओळखला जात होता. २०२५ मध्ये हा प्लॅटफॉर्म अडचणीत आला. भारत सरकारने अशा बोल्ड कंटेंट बनवणाऱ्या अॅपवर बंदी घातली.
आता एकता कपूरने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने जेव्हा ALTT हा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केला, तेव्हा आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल सांगितले.
“आमच्या घरात खूप भांडणे…”
एकताने नुकतीच उषा काकडे प्रोडक्शनला मुलाखत दिली. या मुलाखतीत एकता म्हणाली, “अल्ट हा प्लॅटफॉर्म मी सुरू करावा असे माझ्या आई-वडिलांना वाटत नव्हते. मला माझ्या कामासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, माझी इंडस्ट्रीमध्ये एक प्रतिमा आहे, त्यामुळे बोल्ड कंटेंट असणारे ते अॅप मी सुरू करावे असे माझ्या पालकांना वाटत नव्हते, त्यावरून आमच्या घरात खूप भांडणे झाली. पण मी विचार केला, कुटुंबावर आधारित मी खूप कंटेंट निर्माण केला आहे. मला काहीतरी वेगळे करायचे होते; ज्यामध्ये तरुण, क्राइम, बोल्ड कंटेंट निर्माण करायचा होता, त्यामुळे मी ते अॅप सुरू केले. पण, त्यासाठी मला घरातून पाठिंबा नव्हता.”
एकता असेही म्हणाली, “जेव्हा मी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा माझे आई-वडील चार टोमणे मारायचे. पण, जेव्हा मी हा प्लॅटफॉर्म सुरू केला, तेव्हा मला शंभर टोमणे ऐकावे लागले. ते सकाळपासून मला सांगण्यास सुरुवात करायचे तो प्लॅटफॉर्म बंद कर. शेवटी मी आणि माझ्या आईने राजीनामा दिला, पण यासाठी मला सर्वात जास्त टोमणे ऐकावे लागले. त्या दरम्यान माझे आई-वडील सासूसारखे वागत होते. २०२१ मध्येच एकता कपूर व शोभा कपूर यांनी या अल्ट अॅपमधील त्यांच्या पदांचा राजीनामा दिला होता.
२०२५ मध्ये केंद्र सरकारने कायद्याचे पालन न करणारे अश्लील कंटेंट प्रदर्शित केल्यामुळे ALTT वर बंदी घातली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत ULLU, ALTT, Desiflix, Big Shots यांसह आणखी २४ OTT वेबसाइट्सना ब्लॅकलिस्ट करण्यात आले.
