Elvish Yadav Bollywood Debut with Riteish Deshmukh : तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला एल्विश यादव आता बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री करणार आहे. यूट्यूबपासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास बॉलीवूडपर्यंत आला आहे. अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर आता एल्विश यादव हा अभिनेता म्हणून सिनेविश्वामध्ये झळकणार आहे. लवकरच तो लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख व परेश रावल यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहित एल्विशने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एल्विश यादवने एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर पोस्ट लिहित बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. तसेच रितेश देशमुख, परेश रावल व राजपाल यादव यांच्याबरोबर काम करायला मिळाल्यामुळे आभार मानले आहेत. एल्विशची ‘मालामाल वीकली २’ या कॉमेडी सिनेमासाठी निवड करण्यात आली असून लवकरच तो मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
बॉलीवूडमध्ये माझं कोणी ओळखीचं नाही – एल्विश यादव
एल्विश यादवने त्याच्या चाहत्यांसाठी लिहिलं, “नव्या सिनेमाद्वारे नव्या प्रवासाला सुरुवात करतोय, मी बाहेरून आलेलो आहे, त्यामुळे बॉलीवूडमध्ये माझं असं ओळखीचं कोणीच नव्हतं. प्रेक्षकांमधून उठून मी इथपर्यंत आलो आणि प्रेक्षकांच्याच प्रेमामुळे आता मला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे. आज मी जे काही आहे ते तुमच्या प्रेमामुळेच आहे आणि याच प्रेमामुळे मी आता ‘मालामाल’ झालो आहे; असंच माझ्यावर कायम प्रेम करत राहा.”
दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी – एल्विश यादव
यानंतर आणखी एक ट्विट करत रितेश देशमुखसह सिनेमातील इतर कलाकारांचे एल्विश यादवने आभार मानले आहेत. त्यानं लिहिलं, “‘मालामाल वीकली २’मध्ये दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळालीये याचा मला खूप आनंद आहे. परेश रावल, राजपाल यादव, रितेश देशमुख, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळणार आहे. या संधीसाठी मी मनापासून कृतज्ञ आहे. या सर्व कलाकारांकडून काही गोष्टी शिकून चाहत्यांना अभिमान वाटेल असं काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.”
Malamaal Weekly 2 mein itne saare bade stars ke saath kaam karne ka mauka mil raha hai ❤️
— Elvish Yadav (@ElvishYadav) August 13, 2026
Paresh ji, Rajpal ji, Ritesh bhai, Raveena ma’am, Shilpa ma’am… inse bohot kuch seekhne ko milega. ?✨
I’m truly grateful for this opportunity. ❤️ Bas umeed hai ki inse kuch seekh kar…
एल्विश यादव हा तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असून यूट्यूबपासून त्याचा प्रवास सुरू झाला आहे. व्लॉग्स आणि सोशल मीडिया कंटेंटमधून त्याने वेगळी ओळख निर्माण केली, पण त्याला खरी ओळख बिग बॉसमुळे मिळाली. २०२३ मध्ये एल्विश ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाला आणि त्याने विजेतेपद मिळवले. वाईल्ट कार्ड येऊन जिंकणारा एल्विश पहिलाच स्पर्धक ठरला. यानंतर त्याने अनेक रिअॅलिटी शो आणि डिजिटल कंटेंट केले. आता लवकरच एल्विश यादव मोठ्या पडद्यावर झळकणार असून ‘मालामाल वीकली २’मध्ये तो भूमिका साकारणार आहे. ‘मालामाल वीकली २’ सिनेमाचे शूटिंग नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
