Emergency : मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला (CBFC) कंगना रणौत यांच्या इमर्जन्सी ( Emergency ) या चित्रपटाबाबत २५ सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्या असे निर्देश दिले आहेत. चित्रपट प्रदर्शित करायचा की नाही त्याबाबत निर्णय घ्या असं सांगण्यात आलं आहे. कंगना रणौत यांनी हा चित्रपट केला आहे. तुम्ही जर एक भूमिका घेतली तर त्याचं आम्ही कौतुक करु. या प्रकरणात CBFC ने कुंपणावर बसण्याची भूमिका घेऊ नये. जर तुम्हाला चित्रपट प्रदर्शित करायचा नसेल तर ते सांगण्याचं धाडस दाखवा. असं कोर्टाने CBFC ला सांगितलं आहे.
झी एन्टरटेन्मेंटने इमर्जन्सी ( Emergency ) हा सिनेमा प्रदर्शित न झाल्याने CBFC च्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने हा चित्रपट अडवला आहे, बेकायदेशीरपणे या चित्रपटाला मिळणारं प्रमाणपत्र रोखलं आहे असा आरोप केला आहे. झी एन्टरटेन्मेंटने म्हटलं आहे आम्ही चित्रपट आणत आहोत कुठलाही माहितीपट आणलेला नाही. चित्रपट प्रमाणपत्र मंडळाला असं वाटतं का की चित्रपट बघायला येणारे प्रेक्षक मूर्ख आहेत? जे प्रेक्षक पाहतील त्यावर ते विश्वास ठेवतील असं वाटतं आहे का? तसंच आमच्या सर्जनशीलतेचं काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी एक निर्णय दिला होता. त्या निर्णयात असं स्पष्ट करण्यात आलं आहे की कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्याची जबाबदारी प्रशासन घेईल. CBFC ने थेट त्या निर्णयावर येऊ नये. सिनेमाला प्रमाणपत्र देता येणार नाही वगैरे सांगणं सीबीएफसीचं काम नाही.
इमर्जन्सी ( Emergency ) या चित्रपटावर शिख समुदायाने आक्षेप घेतला आहे. भिंद्रनवालेचं पात्र चुकीच्या पद्धतीने रेखाटण्यात आलं आहे असं या समुदायाने म्हटलं आहे. त्यावर न्यायालयाने म्हटलं आहे की तुम्ही चित्रपटाच्या पूर्वी डिसक्लेमर दाखवू शकता. जे काही चित्रपटावरुन चाललं आहे ते थांबलं पाहिजे अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलंच कसं? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
आणखी एक नोटीस
अभिनेत्री कंगना रणौत या सध्या त्यांच्या ‘इमर्जन्सी’ ( Emergency ) चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. मात्र, कंगना यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेला नाही. चंदीगड जिल्हा न्यायालयाने कंगना यांना चित्रपटाबाबत नोटीस बजावली आहे. रविंद्र सिंह बस्सी यांनी तिच्या चित्रपटाबाबत एक अर्ज दाखल केला असून कंगना यांनी त्यांच्या चित्रपटात शीख धर्माची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
इमर्जन्सी ६ सप्टेंबरला होणार होता प्रदर्शित
कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ ( Emergency ) चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आणि हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या चार दिवस आधीच रद्द करण्यात आला. ‘न्यूज 18’च्या एका कार्यक्रमात कंगना रणौत यांनी म्हटलं होतं की मी चित्रपटासाठी माझी मालमत्ताही पणाला लावली आहे,पण आता तो प्रदर्शित होत नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली होती.
कंगना यांच्या ‘इमर्जन्सी’मध्ये कोण-कोण?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाक नायर, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये सतीश कौशिक महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे.