Emraan Hashmi And Yami Gautam Haq Movie : बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा ‘हक’ (HAQ) हा नवा चित्रपट येत्या ७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली जात आहे. शाहबानो यांच्या वारसांनी इंदूर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी येऊ घातलेल्या ‘हक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे.
अॅड. तौसिफ वारसी यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत शाहबानो यांच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की, या चित्रपटामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत आणि चित्रपटात शरियत कायदा महिलांविरोधात दाखवला गेला आहे. तसेच त्यांनी असाही आरोप केला आहे की, चित्रपट निर्मात्यांनी शाहबानो यांच्या वारसांकडून कोणतीही कायदेशीर परवानगी घेतलेली नाही.
इंडिया टुडेने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, चित्रपटातून शाह बानो यांच्या वैयक्तिक आयुष्याचं चित्रण त्यांच्या वारसांची संमती न घेता केलं गेलं आहे. या नोटीसमध्ये मानहानी, तसेच वैयक्तिक आणि प्रसिद्धी हक्कांचं उल्लंघन झाल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.
शाहबानो यांच्या वतीने वकील तौसिफ वारसी यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, “चित्रपट साधारण दोन तासांचा आहे आणि त्यात शाहबानो यांचं वैयक्तिक आयुष्य दाखवलं गेलं आहे. मात्र, घटनाक्रम दाखवला नाही. त्यांचं सादरीकरण कसं केलं आहे आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर किती भर देण्यात आला आहे हे आम्हाला माहीत नाही, त्यामुळे चित्रपटाची कथा आणि त्याची संकल्पना आधी शाह बानो यांच्या कायदेशीर वारसांना दाखवणं गरजेचं आहे.”
मात्र, चित्रपट निर्मात्यांच्या मते, ‘हक’ चित्रपटाची कथा एका पती-पत्नीच्या प्रेमकथेपासून सुरू होते, पण पुढे ती समाजात आजही चर्चेत असलेल्या एका वादग्रस्त विषयावरच्या चर्चेत रूपांतरित होते. या चित्रपटातील न्यायालयीन घडामोडींमधून संविधानातील कलम ४४ अंतर्गत असलेल्या समान नागरी संहितेसारख्या धोरणात्मक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
‘हक’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झाल्यास, याचं दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केले आहे. चित्रपटात वर्तिका सिंग, दानिश हुसेन, शीबा चड्ढा, असीम हत्तांगडी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र, सिनेमाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी केली जात आहे.
