ऐश्वर्या रायचा चाहतावर्ग फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. विविध नामांकित आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याची एक वेगळीच क्रेझ आहे. अभिनेत्रीने १९९४ मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकला होता. तिला ‘ब्युटी विथ ब्रेन’ देखील म्हटलं जातं. पण, याच प्रेक्षकांच्या लाडक्या ऐश्वर्याला एका लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्याने भर कार्यक्रमात ‘प्लास्टिक’ म्हणून संबोधलं होतं. यानंतर बरीच कॉन्ट्रोव्हर्सी झाली. या अभिनेत्याचं नाव आहे इमरान हाश्मी. अभिनेत्याला या वक्तव्याचा नंतर पश्चाताप सुद्धा झाला. या संपूर्ण वादावर इमरानने काही वर्षांपूर्वी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

‘कॉफी विथ करण’च्या चौथ्या पर्वाच्या एका भागात इमरान हाश्मी सहभागी झाला होता. या शोमध्ये एक गिफ्ट हँपर जिंकण्यासाठी रॅपिड फायर राऊंड खेळवला जातो. या सेगमेंटमध्ये करण शोमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना इंडस्ट्री संदर्भात विविध प्रश्न विचारतो. याचदरम्यान, इमरानने ऐश्वर्या राय-बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. “एक हँपर जिंकण्यासाठी मी ऐश्वर्याला प्लास्टिक म्हणालो होतो..पण त्याचा निश्चितच मला पश्चाताप आहे”, असं अभिनेत्याने यावर सांगितलं.

‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इमरानला विचारण्यात आलं की, ऐश्वर्या राय-बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटल्याचा पश्चाताप होतोय का? या प्रश्नावर इमरान म्हणाला, “हो! मला या गोष्टीचा आजही पश्चाताप आहे. कारण, मी तिचा खूप सन्मान करतो आणि मला या वक्तव्याचा पश्चाताप कायम राहील. आता लोक खूप जास्त संवेदनशील झाले आहेत आणि सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर नाराजी व्यक्त केली जाते…आणि मला खरंच माझी ही चूक मान्य आहे.”

“खरंतर, हम दिल दे चुके सनम’ सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मी ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता होतो आणि अजूनही मी तिचा फॅन आहे. मी फक्त तिला पाहण्यासाठी तिच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर ३ तास उभा होतो. काही वर्षांपूर्वी माझ्या ‘कसूर’ सिनेमाचं शूटिंग सुरू होतं आणि तेव्हाच तिथे ऐश्वर्या सुद्धा तिच्या एका प्रोजेक्टचं शूट करत होती…पण, मी आजवर तिला भेटलेलो नाहीये. मला तिला एकदा तरी भेटायला आवडेल आणि तिला मी केलेल्या वक्तव्याचं वाईट वाटलं असेल, तर मी तिची नक्कीच माफी मागेन.”

दरम्यान, २०१९ मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या म्हणाली होती की, “मी फेक आणि प्लास्टिक असल्याचं म्हटलं गेलं आहे; जे अत्यंत वाईट आहे.” या वक्तव्यामुळेच ऐश्वर्याने इमरान हाश्मीबरोबर काम करण्यास नाकारलं होतं, अशा चर्चाही रंगल्या होत्या.