Emraan Hashmi Awarapan 2 Marathi Review: अभिनेता इम्रान हाश्मीचा बहुप्रतिक्षित ‘आवारापन २’ हा चित्रपट अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. इमरान हाश्मी ‘शिवम पंडित’ या आपल्या आयकॉनिक भूमिकेत परतल्यामुळे प्रेक्षकांच्या २००७ मधील ‘आवारापन’ चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची थेट टक्कर सनी देओलच्या ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटाशी होत आहे. एक्सवर चाहते चित्रपटाचे अप्रतिम बॅकग्राउंड म्युझिक, गाणी आणि इम्रानच्या दमदार अभिनयाचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
‘आवारापन २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर चाहते त्याबद्दल एक्सवर पोस्ट करून रिव्ह्यू देत आहेत. इमरानने साकारलेल्या दमदार भूमिकेसाठी त्याचं कौतुक होतंय. “सुरुवातीच्या २० मिनिटांतच तुम्ही ‘शिवम पंडित’च्या पात्राशी कनेक्ट व्हाल,” असं एका युजरने म्हटलंय.
शुक्रवारी, सुट्टीचा दिवस नसतानाही इमरान हाश्मीच्या चित्रपटासाठी सकाळच्या शोमध्ये ६०-७०% प्रेक्षक आले आहेत? मी काय २००८-२०१२ च्या काळात परत आलोय का? आवारापन २ साठी प्रेक्षकांची क्रेझ खरंच जबरदस्त आहे. चित्रपटगृहात जेन-झी आणि मिलेनियल्स मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आता बघूया पुढे काय होतं ते, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.
आणखी एका युजरने लिहिलं, आवारापन २ मधील तो सीन, जिथे साधू पुन्हा एकदा शिवमला वाचवतात आणि बॅकग्राउंडला तेरा मेरा रिश्ता हे गाणं वाजत असतं, हा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.
आज प्रतीक्षा संपली… ‘आवारापन २’ अखेर आपल्या भेटीला आला आहे, पुन्हा तेच प्रेम घेऊन जे तुम्ही कधीच विसरला नाहीत आणि ती वेदना जिच्यापासून तुम्ही कधीच दूर होऊ शकला नाहीत. काही कथा फक्त पाहिल्या जात नाहीत… त्या पुन्हा अनुभवल्या जातात, अशा शब्दांत एका नेटकऱ्याने आवारापन २ चं कौतुक केलं.
“Awarapan 2 Review – बॅकग्राउंड म्युझिक अप्रतिम आहे. इमरान हाश्मी शिवम पंडितच्या भूमिकेत जबरदस्त वाटतोय. चित्रपटाची पहिली फ्रेम उत्तम आहे. इमरान हाश्मी बाईक राइड करताना तो फिर आओ गाणं बॅकग्राउंडमध्ये वाजतं. चित्रपट चांगलाय, पण वेगाने पुढे सरकतो, त्यामुळे काही तर्कहीन गोष्टींबद्दल फारसे प्रश्न पडत नाही आणि तुम्ही चित्रपट एंजॉय करता,” अशी पोस्ट एका चाहत्याने केली आहे.
या चित्रपटात इमरान हाश्मीबरोबर शबाना आझमी व दिशा पाटनी यांच्या भूमिका आहेत.
