इमरान हाश्मी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘गँगस्टर’, ‘मर्डर’, ‘आवारापन आणि ‘जन्नत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत त्याने बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, इमरान हाशमीपूर्वी त्याच्या आजीनेही सिनेसृष्टीवर राज्य केलं होतं?
फार कमी लोकांना माहीत आहे की इमरान हाशमीच्या आजीही एकेकाळी सिनेसृष्टीतील मोठ्या स्टार होत्या. विशेषतः १९४०च्या दशकात त्यांचा चांगलाच दबदबा होता. जागरणच्या वृत्तानुसार अवघ्या १६व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सिनेसृष्टीतील चढ-उतारांबरोबर लोकप्रियताही अनुभवली.
इमरान हाशमीच्या आजी होत्या सुपरस्टार
ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत, त्या म्हणजे मेहर बानो सिनेसृष्टीत त्यांना पूर्णिमा दास वर्मा या नावाने ओळखलं जात होतं. १९४०च्या दशकातील त्या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. पूर्णिमा यांनी जेव्हा सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं, तेव्हा पुढे त्या मधुबाला आणि नर्गिस दत्त यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींच्या तोडीस तोड लोकप्रियता मिळवतील, याची कोणालाही कल्पना नव्हती.
मधुबाला-नर्गिस यांच्याशी व्हायची तुलना
पूर्णिमा दास वर्मा या त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानल्या जात होत्या. त्यांच्या सौंदर्याची आणि अभिनयाची तुलना मधुबाला आणि नर्गिस यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींशी केली जायची. त्यांचं सौंदर्य, चेहऱ्यावरील भाव आणि अभिनयाचं अनेक जण कौतुक करायचे. पूर्णिमा दास वर्मा यांनी अवघ्या १६व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्या त्यावेळी शाळेत शिकत होत्या. त्यांचे शेजारी रहमान बी. देसाई यांनी त्यांना ‘राधेश्याम’ या गुजराती चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटात त्यांनी राधाची भूमिका साकारली. यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली.
पूर्णिमा दास वर्मा यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘थेस’ होता. या चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी ‘पतंगा’, ‘जोगन’, ‘सगाई’, ‘जाल’, ‘औरत’, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘जंजीर’ आणि ‘नाम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र १९४९ मध्ये प्रदर्शित झालेल्या एच.एस. रवैल यांच्या ‘पतंगा’ या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवलं.
पूर्णिमा दास वर्मा यांचं वैयक्तिक आयुष्य
सहा भावंडांपैकी एक असलेल्या पूर्णिमा दास वर्मा यांनी आयुष्यात दोन लग्नं केली. त्यांचं पहिलं लग्न सय्यद शौकत हाशमी यांच्याशी झालं होतं. या दोघांना अन्वर हाशमी नावाचा मुलगा झाला. मात्र, भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात पूर्णिमा यांचे पहिले पती शौकत हाशमी पाकिस्तानात स्थलांतरित झाले.
