Awarapan 2 First look: काही सिनेमे हे वर्षानुवर्षे लक्षात राहतात. कारण- त्याची कथा, त्यातील कलाकार, गाणी यांची सातत्याने चर्चा होत राहते. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला आवारापन हा अशाच चित्रपटांपैकी एक आहे.

१९ वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला

आवारापन या सिनेमात इमरान हाश्मी व श्रेया शरण हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते. मोहित सुरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तसेच, इमरान हाश्मी व श्रेया शरण यांच्या जोडीलादेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

आता या सिनेमाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे १९ वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आवारापन २ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित केला आहे.

आता या सिनेमात कोणकोणते कलाकार दिसणार आणि हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार, ते जाणून घेऊ…

मुदस्सर खान त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘आवारापन २’ची झलक दाखविणारा, फर्स्ट लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘आवारापन’ सिनेमातील काही सीन्सची झलक पाहायला मिळत आहे. नितीन कक्कर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. बिलाल सिद्दीकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. मुकेश भट्ट या सिनेमाची निर्मिती करीत आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत सिनेमा पाहण्यास उत्सुक असल्याचे लिहिले आहे. तसेच, इमरान हाश्मीला पुन्हा एकदा शिवम या भूमिकेत पाहण्यास आवडेल, असेही लिहिले आहे. तर अनेकांनी, आवारापन या चित्रपटाबरोबर अनेक आठवणी जोडल्या आहेत, असे लिहिले आहे.

इमरान हाश्मीबरोबर या चित्रपटात दिशा पाटनीही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या दोघांबरोबर आणखी कोणते कलाकार या ‘आवारापन २’मध्ये दिसणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या व्हिडीओमध्ये सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे, याचाही खुलासा करण्यात आला आहे. ३ एप्रिल २०२६ रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, याआधी त्याचा ‘हक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अभिनेत्री यामी गौतम या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसली होती.