हेमा मालिनी यांची लेक आणि अभिनेत्री ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आधी घटस्फोट त्यानंतर वडील अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन. यामुळे ईशा खासगी आयुष्यात कठीण काळातून जात आहे. अशातच आता अभिनेत्रीने घटस्फोटानंतर तिला तिच्या आयुष्यामध्ये प्रेमाची कमतरता जाणवते असं सांगितलं आहे.

ईशा देओलने उद्योगपती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. २०२४ मध्ये लग्नाच्या दहा वर्षांहून अधिक काळानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ईशाने सांगितलं की, आयुष्यात प्रेम आणि रोमान्सची उणीव तिला नक्कीच जाणवते. मात्र, आलेल्या कठीण अनुभवांनंतरही तिचा प्रेमावरील विश्वास अजिबात कमी झालेला नाही. भविष्यात पुन्हा एकदा प्रेम तिच्या आयुष्यात येईल, अशी आशा ती आजही बाळगून आहे.

ईशा देओलची घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया

ईशा देओल नुकत्याच कर्ली टेल्सलाला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटानंतर मानसिक त्रासातून जात असल्याबद्दल भाष्य केलं. या अनुभवाबद्दल बोलताना ईशाने सांगितलं की तिला तिच्या घटस्फोटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ नये असं वाटत होतं मात्र, सेलिब्रिटी असल्यामुळे तिला आणि भरतला ही परिस्थिती संयमाने, संवेदनशीलतेने आणि सन्मानाने हाताळावी लागेल, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. ईशा म्हणाली, “हे आमच्या दोघांमधील खूप वैयक्तिक गोष्ट आहे. पण आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो, त्यामुळे आमच्या आयुष्यातील गोष्टी लोकांसमोर येतात. मी, भरत किंवा त्याचं कुटुंब वैयक्तिक गोष्टींबद्दल उघडपणे बोलणारे नाही. मात्र त्या वेळी परिस्थितीच तशी होती. यात आमच्या मुलींचाही प्रश्न होता. अशा नाजूक प्रसंगांना खूप संयमाने सामोरं जावं लागतं. या संपूर्ण काळात माझ्या कुटुंबाने मला कायम खंबीर साथ दिली.”

ईशाने यावेळी तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट्सवरील कमेंट्स सेक्शन बंद असल्याचंही सांगितलं. तिच्या कुटुंबासाठी अतिशय संवेदनशील काळ सुरू असताना सोशल मीडियावरील प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत होत्या. त्यामुळे त्या परिस्थितीचा ताण वाढू नये म्हणून तिच्या टीमने हा निर्णय घेतला. ईशा म्हणाली, “सध्या माझ्या पोस्टवरील कमेंट्स बंद आहेत. हा निर्णय मी घेतलेला नाही, तर माझ्या टीमने घेतला आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत मी फार सक्रिय नाही. त्या काळात आमच्या कुटुंबासाठी परिस्थिती खूपच संवेदनशील होती आणि ऑनलाइन येणाऱ्या प्रतिक्रियांचा ताण खूप वाढला होता. त्यामुळे कमेंट्स बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला.”

प्रेमावरचा विश्वास अजूनही आहे कायम

ईशाने पुढे सध्या तिला तिच्या आयुष्यात प्रेम आणि रोमान्सची उणीव जाणवते असं म्हटलं आहे. स्वतःबद्दल बोलताना ती म्हणाली की, ती नेहमीच प्रेमावर मनापासून विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. ईशा म्हणाली, “माझ्या मते, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम आणि रोमान्स या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि सध्या मला त्यांचीच उणीव जाणवत आहे. मी खूप रोमँटिक आहे. मी पूर्णपणे रोमान्टिक-कॉमेडी चित्रपटांची चाहती आहे. मला प्रेमगीतं आणि प्रेमकथा खूप आवडतात.” ईशाला घटस्फोटानंतर प्रेमावरचा विश्वास कायम आहे की कमी झाला असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “नाही, अशा गोष्टींमुळे प्रेमाविषयीचा माझा विश्वास बदलत नाही. आयुष्यात ब्रेकअप होतात. यापूर्वीही माझे काही बॉयफ्रेंड होते आणि आमचं नातं संपलं. हा आयुष्याचा भाग आहे. पण त्यामुळे माझ्या मनातील प्रेमाची संकल्पना अजिबात बदललेली नाही.”

यावेळी ईशाने तिचे आई-वडील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नात्याचाही उल्लेख केला. त्यांच्या नात्यातील निःस्वार्थ प्रेम, परस्परांचा आदर आणि सन्मान आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळतो, असं तिने सांगितलं. याबद्दल ती म्हणाली, “अशा प्रकारचं प्रेम आजकाल फारसं पाहायला मिळत नाही. मी ते अगदी जवळून अनुभवलं आहे. त्यांच्या नात्यात सन्मान होता, एकमेकांविषयी आदर होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निःस्वार्थ प्रेम होतं.”