When Esha Deol met Dharmendra first wife Prakash Kaur : दिग्गज दिवगंत अभिनेते धर्मेंद्र यांनी दोन लग्नं केली, पण त्यांची दोन्ही कुटुंबे कायम एकमेकांपासून लांब राहिली. धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नी प्रकाश कौरपासून सनी देओल, बॉबी देओल आणि अजिता व विजेता अशी चार अपत्ये आहेत. तर, दुसऱ्या पत्नी हेमा मालिनींपासून ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी हेमा मालिनी व प्रकाश कौर लग्नानंतर कधीच एकमेकींना भेटल्या नाहीत. पण ईशा मात्र एकदा सावत्र आईला भेटली होती. ईशा देओलने स्वतः प्रकाश कौर यांच्या भेटीची आठवण सांगितली होती.
धर्मेंद्र यांनी दोन्ही कुटुंबे वेगळी ठेवली. प्रकाश कौर जुहू येथील बंगल्यात राहिल्या, तर हेमा मालिनी त्यांच्या बंगल्यात स्वतंत्र राहिल्या. त्या कधीच सासरी गेल्या नाहीत. हेमा मालिनींनी सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाचं जाहिर कौतुक केलं होतं. आणि ईशा देओलने भावाच्या सिनेमाचा खास शो ठेवला होता. तेव्हाच ही सावत्र भावंड एकत्र दिसली होती. हेमा मालिनी यांच्या जीवनचरित्रात ईशा देओलने वडिलांच्या पहिल्या पत्नीबद्दल लिहिलंय. ईशाने प्रकाश कौर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते, असा खुलासा खुद्द ईशाने केला होता.
आजारी होते अभय देओलचे वडील
‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात ईशाने लिहिलंय की ती तिचे काका अजित देओल यांच्या खूप जवळ आहे. अजित हे अभय देओलचे वडील होय. २०१५ मध्ये अजित खूप आजारी पडले होते आणि तिला त्यांना भेटायचं होतं. धर्मेंद्र यांच्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळी सनी देओलने तिची अजित देओल यांच्याशी भेट घालून दिली होती.
“मला माझ्या काकांना भेटायचं होतं. त्याचं माझ्यावर आणि आहानावर खूप प्रेम होतं आणि आम्ही अभयच्या देखील खूप जवळ होतो. त्यावेळी बाबांच्या घरी जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. ते रुग्णालयातही नव्हते, नाहीतर आम्ही तिथे जाऊन भेटलो असतो. म्हणून मी सनीला फोन केला आणि त्याने आमची भेटण्याची व्यवस्था केली,” असं ईशा देओलने म्हटलं होतं.
ईशाने सांगितलं की जेव्हा ती तिचे काका अजित देओल यांना भेटण्यासाठी धर्मेंद्र यांच्या घरी गेली तेव्हा तिने तिथे प्रकाश कौर यांना पाहिलं. ती प्रकाश कौर यांना फार कमी काळासाठी भेटली होती. प्रकाश कौर ईशाला आशीर्वाद देऊन निघून गेल्या होत्या. “मी त्यांच्या पाया पडले, त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि त्या निघून गेल्या,” असं ईशा देओलने सांगितलं होतं. ईशा देओल ३० वर्षांची असताना पहिल्यांदा त्या घरी गेली होती आणि सावत्र आईला भेटली होती.
धर्मेंद्र यांनी विवाहित असूनही, मुलं असूनही १९८० मध्ये त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट न घेता हेमा मालिनींशी दुसरं लग्न केलं होतं.

