भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याच्या मैदानातील खेळाबरोबरच त्याचे वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. हार्दिकने दोन वर्षापूर्वी नताशापासून घटस्फोट घेतला, त्यानंतर आता तो माहिका शर्माला डेट करतोय. हार्दिकच्या आयुष्यात नताशा येण्यापूर्वी हार्दिक आणि बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता या अफवांवर स्वतः ईशा गुप्ताने मौन सोडलं असून, त्यांच्यात नेमके काय संबंध होते याचा खुलासा केला आहे.
“ते डेटिंग नव्हतंच, आम्ही फक्त एक-दोनदाच भेटलो”
हार्दिकबरोबर काही महिने बोलल्याची कबुली ईशाने दिली. “हो, काही काळ आम्ही बोलत होतो. पण मला वाटत नाही की आम्ही डेटिंग करत होतो. आम्ही काही महिने नक्कीच बोलत होतो. आम्ही ‘कदाचित डेट करू किंवा नाही’ अशा टप्प्यावर होतो. पण आम्ही डेटिंगच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच सगळं संपलं. म्हणजे खरं तर ते डेटिंग-डेटिंग नव्हतं. आम्ही एक-दोनदा भेटलो, बस्स इतकंच. तर हो, मी म्हटल्याप्रमाणे काही महिने आम्ही बोललो आणि नंतर ते संपलं,” असं ईशा गुप्ताने सांगितलं.
दोघेही एक जोडपं म्हणून एकत्र येऊ शकले असते का? असं विचारल्यावर ईशा गुप्ता म्हणाली, “कदाचित ते घडलं असतंही. पण मला वाटत नाही की ते घडायला पाहिजे होतं. कारण त्या बिचाऱ्यांना लाईव्ह टीव्हीवर काही गोष्टी बोलल्याने टीकेचा सामना करावा लागत होता. त्याआधीच आम्ही एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं.” ईशाने ‘कॉफी विथ करण’च्या वादग्रस्त एपिसोडचा उल्लेख केला. हार्दिक पंड्याने त्यात वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली होती.

हार्दिकबरोबरचं नातं फुलण्यापूर्वीच का संपलं?
हार्दिक व तिच्यातलं नातं फुलण्याआधीच का संपलं? असं ईशाला विचारल्यावर ईशा म्हणाली, “तो एपिसोड प्रसारित झाला, त्याआधीच आमच्यातलं सगळं संपलं होतं. आम्हाला असं जाणवलं की आम्ही एकमेकांसारखे नाही आणि कम्पॅटिबल नाहीयोत. आणि प्रत्येकाचा एक टाइप असतो. मला प्रसिद्धीपेक्षा कुटुंब आणि खरं आयुष्य जास्त आवडतं. अर्थात मला माझं काम आवडतं. कॅमेरा नसता तर ईशा गुप्ता नसती. पण दिवस संपला की घरी जाऊन माझ्या आईची विचारपूस करायला आवडतं, तिची बोलणी खायला आवडतं. दररोज सकाळी उठून देवा मी व माझा पती किती सुंदर दिसतो असं म्हणायला मला जमणार नाही. मला ते सहनच होणार नाही.”
हार्दिक पंड्या माझ्या टाइपचा नाही – ईशा गुप्ता
हार्दिक पंड्याबद्दल नव्हे तर फिल्म इंडस्ट्रीतील सामान्य टेंडन्सीबद्दल बोलत असल्याचं ईशाने स्पष्ट केलं. “मी हार्दिक पंड्याबद्दल काहीच बोलत नाहीये. ते इंडस्ट्रीबद्दल होतं. कारण प्रत्येक नात्याचे विविध टप्पे असतात. आम्ही दोघेही एकमेकांना भेटून चर्चा करण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचलोच नाही. मला वाटलं की आम्ही कम्पॅटिबल नव्हतो, त्यामुळे आमच्यातील गोष्टी पुढे सरकल्या नाहीत. त्याच्यात किंवा माझ्यात काहीतरी कमतरता होती, असं अजिबात नाहीये, पण आम्ही खूप वेगळे होतो. एकमेकांशी बोलत असतानाच एक-दोन महिन्यांत त्यालाही कळलं की मी त्याच्या टाइपची नाही आणि मलाही तो माझ्या टाइपचा नाही हे जाणवलं,” असं ईशा गुप्ताने नमूद केलं.
हार्दिक पंड्या व ईशा गुप्ता यांच्या नात्याची चर्चा २०१८ मध्ये झाली होती. ते दोघे एका पार्टीत भेटले होते आणि मग डेट करू लागल्याचं म्हटलं जात होतं, पण ते नातं डेटिंगपर्यंत पोहोचलंच नाही असं ईशा गुप्ताने सांगितलं आणि सर्व अफवांना पूर्णविराम दिला.
