सुप्रसिद्ध रॅपर आणि गायक आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया उर्फ बादशाह याने संगीत क्षेत्रात अल्पावधीतच मोठे नाव कमावले आहे. त्याने बॉलिवूड आणि पंजाबी सिनेमांमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहनमीच चर्चेत असतो. नुकतंच त्याने त्याच्या एका चाहतीला स्वतःकडची एक महागडी गोष्ट भेट म्हणून दिल्यामुळे तो चर्चेत आला आहे.
नुकत्याच झालेल्या यूट्यूब फॅन फेस्टिव्हलमध्ये बादशाहने १५ वर्षांच्या मुंबई स्थित चाहतीला १ लाख ५० हजारांचे व्हर्जिल अबलोह-डिझाइनचे लुई व्हिटॉनचे स्निकर्स भेट म्हणून दिल्याने बादशाह चर्चेत आला आहे. कार्यक्रमात परफॉर्म करताना बादशाहने आपल्या पायतील ते महागडे शूज काढले अन् एका लकी फॅनला त्याने ते दिले.
आणखी वाचा : बॉलिवूड सेलिब्रिटीज एका इंस्टाग्राम पोस्टसाठी घेतात ‘इतके’ कोटी; सर्वाधिक मानधन कोण घेतं? जाणून घ्या
कार्यक्रमात पुढील रांगेतच उपस्थित असलेल्या मोनिका बोहरा या मुंबईच्या १५ वर्षीय मुलीला बादशाहने स्वतःचे महागडे शूज काढून दिले. तिच्या वाढदिवसाचं एवढं मोठं गिफ्ट बादशाहकडून मिळाल्याचा तिला अत्यानंद झाला तिने लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी शेयर केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल होत आहे.
नेटकरीसुद्धा बादशाहच्या या कृतीचं कौतुक करत आहेत. याविषय बादशाह म्हणाला, “मी माझ्या चाहत्यांचा ऋणी आहे. माझ्यात सुधारणा केवळ त्यांच्यामुळेच शक्य झाली. चाहत्यांचे ही ऋण मी कसे फेडू असा प्रश्न मला बऱ्याचदा पडतो, त्यामुळे त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानतो.” स्निकर्स आणि त्यातूनही ब्रॅंड याबाबतीत बादशाह किती हळवा आहे ते आपल्याला ठाऊक आहेच. तरी दीड लाखांचे शूज त्याने एका चाहतीला भेट म्हणून दिल्यावर तो त्याच्या चाहत्यांची किती कदर करतो ही गोष्ट आपल्यासमोर येते.