Farah Khan On Akshaye Khanna: अक्षय खन्नाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता कोरिओग्राफर आणि निर्माती म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या फराह खानने त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने कोणत्या कलाकाराबरोबर काम करणे कठीण होते, याबद्दल सांगितले आहे.
फराह खान अभिषेक बच्चनबद्दल म्हणाली…
फराह खानने Bosco and Caesar यांच्या ‘डान्स मस्ती’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत ती म्हणाली, “अभिषेक बच्चन चांगला डान्सर आहे, पण तो इतकी मस्ती करतो की त्यामुळे थकायला होतं. त्याला इकडे तिकडे फिरायचं असतं. तो आजूबाजूच्या गोष्टींबद्दल मस्करी करत असतो, लोकांना चिडवत असतो.”
फराह खानचे अभिषेकबद्दलचे मत ऐकल्यानंतर Caesarनेसुद्धा एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मी गेटवे ऑफ इंडियाजवळ त्याच्याबरोबर शूटिंग करत होतो. मध्यरात्री त्याने थंड पाण्याने भरलेली एक बादली आणली आणि माझ्यावर ओतली, तो सतत प्रँक करत असतो.”
“अक्षय खन्नाबरोबर काम करणे…”
पुढे फराह खानने कोणत्या कलाकाराबरोबर काम करणे कठीण वाटले याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “एक काळ असा होता की अक्षय खन्नाबरोबर काम करणे कठीण वाटत असे. मी त्याच्याबरोबर ‘डोली सजा के रखना’मध्ये काम केले आहे. ‘लावारिस’सारख्या इतर अनेक सिनेमांतही त्याच्याबरोबर काम केले आहे. मला वाटतं की त्याने स्वत:च मुलाखतींमध्ये हे कबूल केले आहे की, त्याच्याबरोबर काम करणे इतरांसाठी कठीण जायचे. त्याची चिडचिड व्हायची, त्याला उभं राहायलाही आवडत नसे.”
अक्षयच्या अशा वागण्याला कंटाळून त्याच्याबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतल्याचे फराह खानने सांगितले. ती म्हणाली, “मी सांगितले होते जर अक्षय खन्नाचे गाणे असेल तर मी कोरिओग्राफी करणार नाही.”
मात्र, तरीही फराह खानने पुन्हा अक्षयबरोबर ‘दिल चाहता है’ सिनेमामध्ये काम केले. त्यावेळी तिचे अक्षयबद्दलचे मत बदलले. ती म्हणाली, “‘दिल चाहता है’मध्ये तो बदलला होता. ‘तीस मार खान’ सिनेमात आम्ही जेव्हा एकत्र काम केले, त्यावेळी तो खूप चांगलं वागला. तो खरंच चांगला डान्सर आहे.”
फराह असेही म्हणाली की, “सेटवर कसे वातावरण हवे याबद्दल मी कायमच स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच जे त्रास देतात, त्यांच्याबरोबर काम करणार नसल्याचेही मी स्पष्टपणे सांगते.”
दरम्यान, अक्षय खन्ना लवकरच ‘महाकाली’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
