मणी रत्नम यांचा ‘दिल से’ हा चित्रपट आठवतोय का? या सिनेमाची कथा तर दमदार होतीच, त्यातील गाणी देखील खूप गाजली होती. ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी आजही चाहते आवडीने ऐकतात. या चित्रपटातील काही गाणी फराह खानने कोरिओग्राफ केली होती. त्यात शाहरुख खान आणि मनीषा कोईराला यांच्यावर चित्रित केलेल्या ‘सतरंगी रे’ या गाण्याचाही समावेश होता. हे गाणं कोरिओग्राफ करताना फराह खानला एक मोठी अडचण आली होती.
रणवीर अलाहाबादियाशी बोलताना फराह खानने एक जुनी आठवण सांगितली. ‘सतरंगी रे’ गाण्याचं शूटिंग लडाखमध्ये सुरू होतं, या गाण्याची कोरिओग्राफर फराह खान होती. हे गाणं कोरिओग्राफ करण्यासाठी फराहला गाण्यातील शब्दांचा अर्थ समजून घेणं गरजेचं होतं. यासाठी तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज लेखक जावेद अख्तर यांची मदत घेतली होती.
मदतीसाठी फराह खानने जावेद अख्तर यांना केलेला फोन
फराह म्हणाली, “मला या गाण्याचा अर्थ समजत नव्हता, कारण गुलजार साहेबांनी त्यात काही कठीण शब्द वापरले होते. तुमचा विश्वास बसणार नाही, पण गुलजारजींनी लिहिलेल्या गाण्यांचा अर्थ विचारण्यासाठी मला जावेद अख्तर यांना फोन करावा लागला होता. विशेष म्हणजे, दिग्दर्शक मणी रत्नम यांना हिंदी येत नव्हतं, कॅमेरामनला हिंदी येत नव्हतं आणि संगीतकार ए.आर. रहमान यांनाही हिंदी कळत नव्हतं. त्यामुळे लडाखमधून मी जावेदजींना फोन करून गाण्याचा अर्थ समजून घेत होते. मी जावेदजींना विचारलं, ‘हे काय लिहिलंय? आणि हे कोणी लिहिलंय?'” अशा रितीने जावेद अख्तर यांनी फराहला हे गाणं समजून घेण्यास मदत केली होती.
जावेद अख्तर यांनी ५ लिहिलेलं ‘ते’ गाणं
फराह खानने नंतरच्या काळात, जावेद अख्तर यांना ‘ओम शांती ओम’ चित्रपटासाठी गुलजार यांच्या शैलीतून प्रेरणा घेऊन एक गमतीशीर आणि फारसा अर्थ लागत नाही, असं गाणं लिहायला सांगितलं. “जेव्हा आम्ही ‘दर्द-ए-डिस्को’ गाणं करत होतो, तेव्हा मी जावेदजींना म्हणाले की मला एक वेगळ्या प्रकारचं गाणं हवंय. पण ते गुलजार साहेबांच्या शैलीत हवंय. त्यानंतर फक्त ५ मिनिटांत जावेदजींनी ते गाणं लिहिलं होतं.” ‘दर्द-ए-डिस्को’ हे गाणं सुखविंदर सिंग यांनी गायलं असून विशाल-शेखर यांनी त्याला संगीत दिलं आहे. फराह खानने स्वतः हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं.
माहितीसाठी, जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी इराणी या फराह खानच्या मावशी आहेत, त्यामुळे या दोघांमध्ये कौटुंबिक नातं आहे. फराह खान व फरहान अख्तर मावस भावंडे आहेत.
