Farah Khan Oscars Academy Invitation : सिनेविश्वामध्ये ‘ऑस्कर’ हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठित मानला जातो. ऑस्कर मिळणे किंवा अगदी ऑस्करसाठी नामांकन मिळणे ही एखाद्या कलाकृतीची पोचपावती मानली जाते. ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ ही प्रतिष्ठित संस्था दरवर्षी ‘ऑस्कर’ हा सर्वाधिक मानाचा चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करत असते. या प्रतिष्ठित संस्थेत सामील होण्यासाठी फराह खानला आमंत्रित करण्यात आले आहे. जर तिने हे आमंत्रण स्वीकारले, तर ती अकादमीची अधिकृत सदस्य बनेल. यामुळे तिला आगामी ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात नामांकित चित्रपटांना मतदान करण्याचा आणि विजेत्यांची निवड करण्याचा अधिकार मिळेल. हा कोणत्याही सिनेसृष्टीसंबंधित व्यक्तीसाठी अभिमानाचा क्षण असून फराहने सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त केला आहे.

फराह खान ही सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासह प्रोजेक्ट्सच्या अपडेट शेअर करत असते. AMPAS ची सदस्य होण्यासाठी आमंत्रण आले असल्याचे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. हा सन्मान मिळाल्याचा आनंद आणि अभिमान वाटत असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत. जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट संस्थांपैकी एकामध्ये सामील होण्याचे आमंत्रण मिळणे हा तिच्यासाठी एक खूप खास क्षण आहे, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट फराह खानने केली आहे.

५२९ जणांना सदस्य होण्यासाठी आमंत्रित

दरवर्षी, अकादमी जगभरातील कलाकारांना आणि चित्रपट व्यावसायिकांना सामील होण्यासाठी आमंत्रित करत असते. यावर्षी चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रांतील ५२९ प्रतिभावान व्यक्तींना सदस्य होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत फराह खान तसेच ‘मकबूल’, ‘ओमकारा’ आणि ‘हैदर’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा समावेश आहे.

यंदा ऑस्कर अकादमीकडून आमंत्रित करण्यात आलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील मान्यवरांमध्ये एडिटर श्रीकर प्रसाद आणि दीपा भाटिया यांचाही समावेश आहे. दीपा भाटिया यांनी ‘दिल चाहता है’, ‘साथिया’, ‘तारे जमीन पर’, ‘रॉक ऑन’, ‘माय नेम इज खान’, ‘काय पो चे’ आणि ‘आरआरआर’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. तसेच निर्माती एका लखानी, कास्टिंग डायरेक्टर दिलीप शंकर आणि डॉक्युमेंटरी डायरेक्टर शालिनी कांतय्या यांनाही अकादमीचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

तसेच ॲनिमेशन क्षेत्रातील अवनीत कौर, निर्मिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील राजेश रामचंद्रन, तसेच व्हिज्युअल इफेक्ट्स क्षेत्रातील बेकी ग्रॅहम आणि जय मेहता यांचाही या यादीत समावेश आहे. हे निमंत्रण स्वीकारल्यानंतर हे सर्वजण अकादमीच्या ११ हजारांहून अधिक जागतिक सदस्यांचा भाग बनतील आणि त्यांना ऑस्कर पुरस्कारांच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा मान मिळणार आहे.

फराह खान अनेक दशकांपासून सिनेविश्वामध्ये कार्यरत

फराह खान ही बॉलीवूडमधील सर्वाधिक यशस्वी कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि निर्मात्यांपैकी एक मानली जाते. १९९० च्या दशकात नृत्यदिग्दर्शक म्हणून तिने कारकिर्दीची सुरुवात केली आणि पुढे तिने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ‘मैं हूँ ना’, ‘ओम शांती ओम’, ‘तीस मार खान’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करत तिने दिग्दर्शिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अनेकदा तिचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्यदिग्दर्शनाचे कौतुक झाले असून ती अनेक रिअॅलिटी शोची परीक्षक आणि सूत्रसंचालक म्हणूनही लोकप्रिय ठरली आहे. सध्या ती ‘लॉक अप २’ हा ओटीटी शो होस्ट करत आहे.