फराह खानने ‘मै हूँ ना’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं आणि मग ‘ओम शांती ओम’ हा ब्लॉकबस्टर दिला. त्यानंतर आपला तिसरा चित्रपट ‘तीस मार खान’मध्ये फराह खानने अक्षय कुमारबरोबर काम केलं. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी हिट ठरला होता, मात्र त्यावेळी समीक्षकांनी त्यावर प्रचंड टीका केली होती. या टीकेचा आपल्यावर खूप मोठा परिणाम झाला, अशी कबुली फराह खानने दिली आहे.

गेल्या काही वर्षांत मात्र अनेकांना हा चित्रपट आवडला, त्यामुळे त्याचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. आता फराहने या चित्रपटाच्या शूटिंगची रंजक आठवण सांगितली. अक्षय कुमार शुटिंगसाठी दररोज हेलिकॉप्टरने यायचा, असं फराह खान म्हणाली. फराह खान, अक्षय कुमार, प्रियदर्शन आणि राजपाल यादव त्यांच्या आगामी ‘भूत बंगला’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते. यावेळी गप्पा मारताना फराह आणि अक्षयने ‘तीस मार खान’च्या माळशेज घाटातील शूटिंगच्या आठवणींना उजाळा दिला.

रोज हेलिकॉप्टरने प्रवास करायचा अक्षय कुमार

फराह म्हणाली, “आम्ही माळशेजमध्ये ‘तीस मार खान’चे शूटिंग करत होतो. रोज सकाळी ८ वाजताचा कॉलटाइम असायचा. मुंबईपासून हे ठिकाण अडीच तासांच्या अंतरावर आहे, त्यामुळे सर्वजण तिथेच मुक्कामी असायचे. पण अक्षय मात्र रोज संध्याकाळी पॅक-अप झाल्यावर घरी जायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७:४५ वाजता सेटवर हजर असायचा.” फराहचा हा खुलासा ऐकून राजपाल यादव थक्क झाला. त्यांच्याकडे पाहत फराह आणि अक्षय दोघांनी विचारलं, “सांग बरं कसं ते?” राजपालला काहीच सुचेना. तेव्हा अक्षय म्हणाला, “मी हेलिकॉप्टरने प्रवास करायचो.” त्याचं हे उत्तर ऐकून सगळेच हसायला लागले.

अक्षय कुमारने माझे सगळे पैसे खाल्ले- फराह खानचं वक्तव्य

फराह पुढे म्हणाली, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एखाद्या अभिनेत्याला हेलिकॉप्टरचा वापर टॅक्सीसारखा करताना पाहिले. पण त्याचं कौतुक करायला हवं, कारण तो नेहमी वेळेवर यायचा.” यावर अक्षय लगेच म्हणाला, “पण मी हेलिकॉप्टरने यायचो याचा कोणाला काय प्रॉब्लेम होता? मी स्वतःच त्या चित्रपटाचा निर्माता होतो.” फराहने लगेच उत्तर दिलं, “आणि मीसुद्धा निर्माती होते.” अक्षयने होकार दिला, पण त्यानंतर फराह गंमतीने म्हणाल, “माझे सगळे पैसे ह्यानेच खाल्ले.” मग अक्षयने विचारलं, “मी पैसे खाल्ले? त्या चित्रपटातून सर्वात जास्त पैसे तूच कमावले आहेस.” त्यावर फराह मोठ्याने हसली आणि म्हणाली, “रॉनीला फोन कर आणि आपल्या पैशांबद्दल त्यालाच विचार.”

‘तीस मार खान’वरील टीकेचा वाईट परिणाम झाला – फराह खान

‘तीस मार खान’ने भारतात ८४ कोटी रुपयांची कमाई केली होती, तरीही फराहच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे या चित्रपटाला समीक्षकांचं दाद मिळाली नाही. त्यांनी केलेल्या टीकेचा तिच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला होता. ‘द रणवीर शो’मध्ये बोलताना फराहने त्या कठीण काळाबद्दल सांगितलं होतं. “अशा परिस्थितीमुळे तुम्ही खूप मागे पडता. पुन्हा तुम्ही जोमाने काम करू लागता, पण तुमच्या मनात कुठेतरी नेहमीच एक भीती किंवा दडपण असतं. स्वतःवर शंका येऊ लागते, असं नाही पण लोक तुम्हाला स्वतःवर शंका घेण्यास भाग पाडतात,” असं फराह खान म्हणाली.

चित्रपटसृष्टीत यश आणि अपयश दोन्ही सारखेच तुम्हाला फसवू शकतात, असं फराहला वाटतं. “तुमचा चित्रपट हिट होतो, तेव्हा लोक तुम्हाला असं भासवतात की तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्ही जे काही सांगाल, लोक डोळे झाकून ते करतात. कारण त्यांना वाटतं की तुम्हाला सगळंच येतं. आपल्याला या गोष्टीवरही विचार करावा लागतो. करिअरच्या दृष्टीने तो माझ्यासाठी चांगला काळ नव्हता.”

सततच्या टीकेमुळे नैराश्य आल्याचं फराहने मान्य केलं. “नशीब, त्या काळात फक्त ट्विटर होतं. पण आपले काही मित्र असतात जे लोक आपल्याबद्दल काय बोलत आहेत ते येऊन सांगतात. यामुळे आधी राग येतो, मग वाईट वाटतं आणि शेवटी पॅनिक अटॅक येतं. मलाही असंच व्हायचं आणि पॅनिक अटॅक यायचे, कारण आयुष्यात पहिल्यांदाच तुम्हाला खूप हतबल वाटत असतं,” असं फराह खान म्हणाली.