Why Amitabh Bachchan not in Deewangi Deewangi Song : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा ओम शांती ओम हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. फराह खान दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि सिनेमाने दीपिकाला बॉलीवूडमध्ये दमदार ओळख मिळवून दिली. चित्रपटाइतकीच त्यातील गाणीही प्रचंड गाजली. विशेषतः ‘दीवानगी दीवानगी’ गाण्याने संपूर्ण बॉलीवूडला एकाच फ्रेममध्ये आणले होते. या गाण्यात १९६० च्या दशकापासून सिनेविश्वात असलेल्या धर्मेंद्र यांच्यापासून ते सलमान खानपर्यंत तब्बल ३१ दिग्गज कलाकार झळकले होते. मात्र, बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन हे त्यात उपस्थित नसल्याची बाब अनेकांच्या लक्षात आली होती. इतक्या मोठ्या स्टारकास्टमध्ये अमिताभ बच्चन का दिसले नाहीत, याचा खुलासा आता दिग्दर्शिका फराह खानने केला आहे.
इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन ऑफिशियल (IFTDA) च्या यूट्यूब चॅनेलवर पल्लवी जोशी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये फराह खानने सिनेविश्वातील अनुभव शेअर केले आहेत. तसेच ‘दीवानगी दीवानगी’ गाण्याच्या शूटिंगचे किस्से सांगितले आहेत. या ‘दीवानगी दीवानगी’ गाण्यासाठी आमिर खानने फराहला झुलवत ठेवून नंतर नकार दिल्याचे तिने सांगितले. फराह म्हणाली, “आमिर खाननं नकार देण्यासाठी सगळ्यात मजेशीर कारण दिलं होतं. तो बराच वेळ स्पष्ट उत्तर देत नव्हता. शेवटी त्यानं सांगितलं की, तो ‘तारे जमीन पर’च्या एडिटिंगमध्ये व्यग्र आहे.”
आमिर खानने का दिला होता फराहला नकार?
फराह म्हणाली, “मी त्याला म्हटलं, ‘तू फक्त ये. दोन तासांमध्ये तुझं शूटिंग पूर्ण करते.’ त्यावर त्यानं मला पुन्हा फोन करून सांगितलं, ‘फराह, मी सध्या एडिटिंग करीत आहे. जर दोन तासांसाठीही एडिटिंग सोडून शूटला आलो, तर माझा चित्रपट सहा महिने उशिरा रिलीज होईल.’ ते ऐकून मी त्याला, ‘ठीक आहे, तू येऊ नकोस,’ मात्र नंतर त्याबद्दल विचारलं असता, आमिरनं हसतच कबुली दिली, ‘खरं सांगायचं तर मला यायचंच नव्हतं.’ “
फराह खानने या गाण्याच्या शूटला अमिताभ बच्चन का आले नव्हते, याचे कारणही स्पष्टपणे सांगितले आहे. अमिताभ बच्चन हे शूटिंगला येऊ शकले नाहीत, याचे कारण म्हणजे त्याच आठवड्यात अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांचे लग्न होणार होते. विशेष म्हणजे या गाण्याच्या चित्रीकरणाला अमिताभ हे उपस्थित नव्हते यापेक्षा अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचे निमंत्रण कोणत्याही कलाकाराला देण्यात आले नाही, याचीच चर्चा जास्त रंगली होती.
‘दीवानगी’ गाण्याच्या शूटसाठी अमिताभ का आले नाहीत?
अमिताभ बच्चन यांच्याबाबत फराह खान म्हणाली, “अमिताभ बच्चन ‘दीवानगी’ गाण्याच्या शूटिंगसाठी आले नाहीत. कारण- त्याच आठवड्यात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न होते.” त्यानंतर फराह गमतीने म्हणाली, “तसंही चित्रपटसृष्टीमधील कोणालाच निमंत्रण (लग्नाचं) नव्हतं. त्यामुळे ते सर्व जण शूटिंगसाठी आले. त्यामुळे हे चांगलंच झालं.” फक्त अमिताभ बच्चनच नाहीत, तर दिलीप कुमार आणि देव आनंद हे दिग्गजही गाण्याच्या शूटिंगला आले नाहीत. “देव आनंद यांनी सांगितलं, ‘मी कॅमिओ रोल (छोट्या भूमिका) करीत नाही आणि खरोखरच ते छोट्या भूमिका करीत नाहीत. फरदीन खानला आमच्यासाठी शूटिंगला येत असतानाच दुबई विमानतळावर अटक झाली. अशा अनेक कलाकारांना गाण्यामध्ये घेण्याचे ठरवले होते; पण काही कारणांनी ते येऊ शकले नाहीत.”
‘ओम शांती ओम’ चित्रपटातील ‘दीवानगी दीवानगी’ गाण्यामध्ये बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. त्यामध्ये धर्मेंद्र, रेखा, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, शबाना आझमी, गोविंदा, सलमान खान, सैफ अली खान, संजय दत्त, तुषार कपूर जूही चावला, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा, काजोल, प्रीती झिंटा, करिश्मा कपूर, तब्बू, शिल्पा शेट्टी, ऊर्मिला मातोंडकर, मलायका अरोरा, विद्या बालन, लारा दत्ता, अमृता अरोरा, सुश्मिता सेन, जॅकी श्रॉफ, जायेद खान, बॉबी देओल, आफताब शिवदासानी, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी आदी अनेक कलाकार झळकले होते.
