Farah Khan on genuine natural beauty in Bollywood: फराह खान ही बॉलीवूडमधील लोकप्रिय कोरिओग्राफर व दिग्दर्शक आहे. ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही सहभागी होती. लवकरच ती ‘टॉप ५०’ या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. सध्या या शोची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

फराह खान फक्त चित्रपट किंवा टीव्ही या माध्यमातूनच नाही, तर ती तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. ती अनेक लोकप्रिय कलाकारांच्या घरी तिचा कुक दिलीपसह जाते.

कलाकार काही खास पदार्थ बनवतात. त्याची रेसिपी दाखवली जाते. यादरम्यान, फराह, तसेच ज्यांच्या घरी ती गेली आहे, ते कलाकार विविध किस्से सांगतात. शूटिंगदरम्यानच्या आठवणी सांगतात. तसेच या निमित्ताने कलाकारांची घरे, त्यांची लाइफस्टाईल पाहण्याची संधी मिळते. फराह खानच्या या यूट्यूब व्हिडीओंचा चाहतावर्ग मोठा आहे. या व्हिडीओंमुळे फराह खानचा कुक दिलीपलादेखील मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे.

Award Banner

फराह खान नेमकं काय म्हणाली?

आता मात्र फराह खान तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. फराह खानने शेअर केलेल्या एका यूट्यूब व्हिडीओमध्ये तिने हे वक्तव्य केले आहे. फराह खानचा कुक दिलीप तिच्या चमकदार त्वचेचे कौतुक करते आणि त्याचे रहस्य काय आहे, असे विचारतो. त्यावर मजेशीरपणे फराह खान स्वत:ला श्रेय देते. ती म्हणते की, नैसर्गिकपणे माझी त्वचा चमकदार आहे.

पुढे ती इंडस्ट्रीमध्ये कोण सुंदर आहे, यावर वक्तव्य करते. ती म्हणते की, नैसर्गिक सुंदरता आजच्या काळात फारसे पाहायला मिळत नाही. कारण- सौंदर्यप्रसाधनांचे प्रमाण वाढले आहे. सध्या नैसर्गिक सौंदर्य दुर्मीळ आहे, असेही तिने म्हटले आहे.

फराह खान पुढे असेही म्हणते, “मला ऐश्वर्या राय बच्चन ही नैसर्गिकरीत्या सुंदर वाटते. ऐश्वर्या रायला सोडून क्वचितच कोणीतरी नैसर्गिकरित्या सुंदर असेल.” फराहने इतर कोणत्याही अभिनेत्रीचे नाव घेतले नाही. आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा यांपैकी कोणत्याच अभिनेत्रीचे तिने नाव घेतले नाही. त्यामुळे फराह खानला ऐश्वर्याशिवाय इतर कोणतीच अभिनेत्री नैसर्गिकरीत्या सुंदर वाटत नाही, अशी चर्चा सुरू आहे.

ऐश्वर्या रायबद्दल बोलायचे, तर दीर्घकाळापासून ती तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यासाठीदेखील ओळखली जाते. तिने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला. त्यानंतर ती बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ठरली. तिने अनेक भूमिकांतून स्वत:ला सिद्ध केले. जगभरात तिचा चाहतावर्ग आहे. तिने हम दिल दे चुके सनम, देवदास, मोहब्बतें, जोधा अकबर, धूम २ आणि अलीकडील पोन्नियिन सेल्वन या चित्रपटांतील तिच्या भूमिकांचे कौतुक होताना दिसते.

फराह खान ही तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती सूत्रसंचालन करणार असलेल्या टॉप ५० मध्ये अनेक लोकप्रिय चेहरे दिसणार आहेत. शिव ठाकरे, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, आर्या जाधव हे असे इतर लोकप्रिय ठरलेले कलाकार दिसणार आहेत.