Farah Khan Tamannaah Bhatia Home Tour : बॉलीवूड कलाकारांचे आलिशान घर आणि त्यांची लाइफस्टाईल जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. त्यामुळेच चित्रपट निर्माती व कोरिओग्राफर फराह खान ही तिच्या यूट्यूब चॅनेलद्वारे सेलिब्रिटींच्या घरांची खास झलक दाखवत असते. नुकतीच फराह आणि तिचा कूक दिलीप यांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या मुंबईतील आलिशान घराला भेट दिली. लोखंडवाला परिसरातील या लक्झरी फ्लॅटमधील आकर्षक इंटेरियरर, सुंदर सजवलेली बाल्कनी आणि खासगी जकुजी पाहून सर्व जण थक्क झाले आहेत. तमन्नाचे हे घर एखाद्या स्वप्नातील घरापेक्षा कमी नसल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

लोखंडवालामधील सर्वांत लक्झरी घर – फराह

बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या कुटुंबासह एकाच घरामध्ये राहते. घराबाहेर असणारी ‘भाटिया फॅमिली’ची पाटी लक्षवेधी ठरत होती. त्यानंतर फराह आणि दिलीप यांचे तमन्नाने मोठ्या आनंदाने घरामध्ये स्वागत केले. भारतीय संस्कृतीप्रमाणे दरवाजावर सुंदर नक्षीकाम असलेले तोरण लावण्यात आले होते. ऑलिव्ह ग्रीन रंगामध्ये भलामोठा लाकडी दरवाजा असलेल्या घरामध्ये एन्ट्रीपासून डिझाईन इंटेरियर दिसून येत आहे. तमन्नाचे घर हे लोखंडवालामधील सर्वांत लक्झरी आणि अतिशय सुंदर घरांपैकी एक असल्याचे फराह म्हणाली आहे. संपूर्ण घर हे पांढऱ्या आणि हिरव्या रंगामध्ये सजवलेले असून, त्यासह असलेल्या गोल्डन लाईटने घराला लक्झरी लूक दिला आहे. भलामोठा सोफा आणि कोपऱ्यामध्ये असणारा फिश टँक लक्षवेधी ठरत होता. गुलाबी रंगाचा डायनिंग टेबल, सॉफ्ट लायटनिंग आणि त्यासमोर असणारी भव्य गॅलरी घराला डिझायनर लूक देत आहे.

हॉलमध्ये लावण्यात आले खास पेंटिंग

त्याचबरोबर तमन्ना भाटियाच्या घरामध्ये खास पेंटिंगदेखील लावण्यात आले आहे. तीन फ्रेमचे एकत्रित करून हे सुंदर पेंटिग घराची शोभा वाढवत आहे. पांढऱ्या रंगाच्या भिंतीवरील विविध रंगांनी रेखाटलेले आकर्षक पेंटिंग लक्षवेधी ठरत आहे. त्याबाबत फराहने विचारल्यावर तमन्नाने सांगितले की, हे एकमेव चित्र तिच्या घरामध्ये आहे. एकच ‘पीस ऑफ आर्ट’ तिने घेतले असल्याचे तमन्नाने सांगितले आहे. या चित्रामध्ये लाल रंगाची साडी नेसलेली स्त्री, माकडाचा खेळ करणारा मदारी, भलामोठा हत्ती, गाय आणि ससा यांसह विविध व्यक्तींच्या छटा रेखाटण्यात आल्या आहेत. हॉलमध्ये लावण्यात आलेले एकमेव चित्र लक्षवेधी ठरत आहे.

फॅमिली जकुजी पाहून फराह झाली थक्क

यासह अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या घरामध्ये अशी एक गोष्ट आहे, जी अनेक बड्या सेलिब्रिटींच्या घरी पाहायला मिळत नाही. ते म्हणजे बाल्कनीमध्ये असणारे ओपन जकुजी. हे तमन्नाच्या घरातील सर्वांत आकर्षक गोष्टींपैकी एक आहे. हॉलला जोडलेल्या ‘रॅप अराऊंड’ बाल्कनीमध्ये ती हे जकुजी ठेवले आहे. आतापर्यंत प्रायव्हेट जकुजी आणि गोलाकार पद्धतीचे जकुजी पाहिले असतील. पण, तमन्ना भाटियाच्या घरी चक्क संपूर्ण कुटुंब एकाच वेळी बसू शकेल, असे जकुजी आहे. तमन्नाच्या गॅलरीमध्ये ‘फॅमिकी जकुजी’ बनवण्यात आले आहे. त्यामध्ये एकाच वेळी सहा लोक बसू शकतील, अशी खास रचना करण्यात आली आहे.

तमन्ना भाटियाच्या घरातील फॅमिली जकुजी (फोटो – युट्युब)

काय म्हणाली तमन्ना भाटिया?

या युनिक जकुजीबाबत तमन्ना म्हणाली, “हे सर्व माझ्या वडिलांमुळे शक्य झाले आहे. माझ्या ज्या काही विचित्र कल्पना आणि इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्याचा वडिलांचा प्रयत्न असतो. त्यामुळे घरामध्ये जे काही करावे वाटते, ते करू शकतो. हे आम्ही बनवू घेतले असले तरी अजून संपूर्ण फॅमिली कधीच यामध्ये एकत्र बसलो नाही; पण जेव्हा पण आम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र येतो तेव्हा खूप मजा करतो. अनेकदा आम्ही घरी ‘गर्ल्स पार्टी’ करत असतो. त्यावेळी याचा खूप वापर करतो आणि मजा करतो.”