अभिनेता फरदीन खान १४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘खेल खेल में’ या चित्रपटातून तो मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी या गाजलेल्या वेबसीरीजमधून अभिनेत्याने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. आता फरदीनने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाला अभिनेता?

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फरदीन खानने म्हटले आहे, “‘खेल खेल में’ चित्रपटाचा ट्रेलर तुमच्याबरोबर शेअर करणे, माझ्यासाठी रोमांचकारी आहे. हा क्षण माझ्यासाठी खास असण्याबरोबरच भावुक करणारादेखील आहे. कारण- गेल्या १४ वर्षातील हा पहिला चित्रपट असा आहे, जो मोठ्या पडद्यावर येणार आहे. मोठ्या पडद्यावर परतणे हे कृतज्ञतापूर्ण, उत्साही आणि आठवणीत हरवल्यासारखे आहे.

दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांच्यासोबत काम करणे, उत्तम अनुभव होता. ‘दूल्हा मिल गया’ हा चित्रपट माझा याआधीचा शेवटचा चित्रपट होता,जो चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. ‘खेल खेल में’ या चित्रपटात असे अनेक सीन होते, ज्यामुळे ‘दूल्हा मिल गया’ या चित्रपटातील प्रेमळ आठवणींना उजाळा मिळाला. मुदस्सर यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणामुळे हा प्रकल्प आमच्या सगळ्यांसाठीच खास आहे. या चित्रपटाचा मला भाग होता आले, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

संपूर्ण कलाकार आणि क्रू यांचे समर्पण आणि प्रतिभेमुळे ही गोष्ट सुंदररित्या मांडली गेली आहे. या चित्रपटादरम्यान मला मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि आदराबद्दल मी कायम कृतज्ञ राहीन. माझे कुटुंब, मित्र आणि माझ्या चाहत्यांचे मनापासून आभार. कारण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मला कायम पाठिंबा दिला आहे. तुमच्या प्रेमाशिवाय आणि प्रोत्साहनाशिवाय परतणे शक्य नव्हते. मला आशा आहे की, ‘खेल खेल में’ हा चित्रपट तुमच्या सर्वांशी जोडला जाईल आणि तुम्हाला हा चित्रपट पाहताना आनंद मिळेल.” अशी भावुक पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हेही वाचा: कमल हासन यांचा ‘इंडियन २’ चित्रपट आता ओटीटी होणार प्रदर्शित; कधी, कुठे जाणून घ्या…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे की, सात मित्र-मैत्रिणी आपल्या नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. त्यावेळी त्यांच्यापैकी एकजण इथे आपण मित्र आहोत किंवा नवरा बायको आहोत, पण कोणाच्या मोबाइलमध्ये काय आहे, हे कोणाला माहीत आहे? असे म्हणत आहे. हे मित्र-मैत्रिणी इतर कोणता खेळ खेळण्यापेक्षा ते नवीन खेळ खेळण्याचे ठरवतात. त्यासाठी ते नियम बनवतात. रात्र संपेपर्यंत आपले फोन हे सार्वजनिक मालमत्ता आहे, सगळ्यांनी आपापले मोबाइल सगळ्यांसमोर अनलॉक करून टेबलावर ठेवायचे आणि कोणाच्या मोबाइलवर फोन किंवा मेसेज आला तर तो मोठ्याने सगळ्यांसमोर वाचायचा.

थोडक्यात, कोणाच्या मोबाइलमध्ये काय रहस्य आहे हे सगळ्यांसमोर उघड करायचे, असा हा खेळ आहे. आता या खेळामुळे जमलेल्यांपैकी अनेकांची रहस्ये उघड होताना दिसत असून त्यापुढे नक्की काय होणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार आहे. मात्र, या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.