Fardeen Khan Viral Video : बॉलीवूड अभिनेता फरदीन खान सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मुंबईतील एका पुरस्कार सोहळ्यात फरदीन एका महिलेबरोबर दिसला. अनेक लोक तिला त्याची पत्नी समजत होते; पण फरदीनने स्वतः कॅमेऱ्यासमोर येत याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे आणि गैरसमज दूर केला.

पुरस्कार सोहळ्यात फरदीन एका महिलेबरोबर सहभागी झाला होता. दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते. त्यांना एकत्र पाहून फोटोग्राफर्स महिलेला फरदीनची पत्नी समजले. मात्र, फरदीनला हे समजताच त्याने पापाराझी फोटोग्राफर्सना सांगितले की, ती त्याची पत्नी नाही, तर त्याची बहीण आहे.

सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडीओमध्ये फरदीन पापाराझींना म्हणतो, “ही माझी बहीण आहे; पत्नी नाही. अनेक सोशल मीडिया हँडल्सवर तुम्ही लोक ही माझी पत्नी असल्याचे लिहिता.” हे ऐकून त्याची बहीण लैला खानदेखील म्हणाली, “बरं झालं. तू हा गैरसमज दूर केलास. हे सांगायची गरजच होती.”

Award Banner

दरम्यान, लैलाचे लग्न उद्योजक फरहान फर्निचरवाला यांच्याशी झाले आहे. ती प्रसिद्धीपासून लांब राहणे पसंत करते. कधीतरी पुरस्कार सोहळ्यांत किंवा मोजक्या काही कार्यक्रमांमध्ये ती सहभागी होत असते.

फरदीन खान व्हिडीओ

फरदीन खान हा दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा आहे. त्यामुळे वडिलांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचं त्याच्यावर दडपण होतं. त्यात फरदीनच्या करिअरचा सुरुवातीचा काळ हा खूप संघर्षमय होता. सुपरस्टारचा मुलगा म्हणून मोठ्या अपेक्षांसह सिनेसृष्टीत आलेल्या फरदीनच्या करिअरचा आलेख तसा फारसा चढता राहिलेला नाही.

१९९८ मध्ये ‘प्रेम अगन या चित्रपटापासून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘जानशीन’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘लव्ह के लिये कुछ भी करेगा’, ‘फिदा’ यांसारख्या काही हिट चित्रपटांनंतरही फरदीनला स्टारडम मिळू शकलं नाही. त्यामुळे मधल्या काळात तो अभिनयापासून दूर राहिला.

त्यानंतर तो २०२४ मध्ये फरदीन संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजमध्ये झळकला. त्यातील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं. त्यानंतर तो ‘खेल खेल में’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच गेल्या वर्षीच्या ‘हाउसफुल ५’मधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.

फरदीन खानचे लग्न प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा माधवानी हिच्याशी झाले आहे. गेल्या काही काळापासून फरदीन आणि नताशा यांच्यात बिनसले असून, ते दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावर मुमताज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, “त्यांचे लग्न अजून मोडलेले नाही. दोघे सध्या वेगळे राहत आहेत. मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी घटस्फोट घेऊ नये”, असे मला वाटते.”