Farida Jalal on cursing in O Romeo: विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’ चित्रपटाचा टीझर नुकताच पाहायला मिळाला. हा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.

शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, अविनाश तिवारी व फरीदा जलाल हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. त्याबरोबरच नाना पाटेकर, दिशा पाटनी, विक्रांत मेस्सी व तमन्ना भाटिया हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. टीझरमधील शाहिद कपूरची भूमिका लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत आहे. १३ फेब्रुवारी २०२६ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

शाहिद कपूरबरोबर आणखी एका कलाकाराने लक्ष वेधून घेतले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल या टीझरमध्ये शिवी देत असल्याचे दिसत आहे. आता फरीदा जलाल यांनी एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केले आहे.

Award Banner

“तुम्ही शिवी देणार ना?”

झूमला दिलेल्या मुलाखतीत फरीदा जलाल म्हणाल्या, “हीरामंडी या वेब सीरिजमध्ये संजय लीला भन्साळींबरोबर काम केल्यानंतर विशाल भारद्वाज यांच्याबरोबर माझी काम करण्याची इच्छा होती. ज्यावेळी विशाल भारद्वाज या भूमिकेबद्दल बोलण्यासाठी माझ्या घरी आले होते, त्यावेळी त्यांना याबद्दल मी सांगितले होते. मला तुमच्याबरोबर काम करायचं होतं, असं मी त्यांना सांगितलं होतं.”

पुढे फरीदा जलाल म्हणाल्या, “विशाल भारद्वाज त्यावेळी मला म्हणाले की, सगळ्यात आधी मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. मी म्हणाले की विचारा. ते म्हणाले, तुम्ही शिवी देणार ना?”

विशाल भारद्वाज यांनी विचारलेल्या प्रश्नानं आश्चर्य वाटल्याचं सांगत अभिनेत्री म्हणाल्या, “ज्यावेळी त्यांनी तो प्रश्न विचारला, त्याला काय उत्तर देऊ हे मला समजलं नाही; पण मी त्यांना नकार देऊ शकले नाही. ज्या दिग्दर्शकाबरोबर मला काम करायचे होते, तो माझ्यासमोर बसला होता; पण मी त्यांच्यासमोर काही अटी ठेवल्या.”

विशाल भारद्वाज यांच्यासमोर कोणत्या अटी ठेवल्या होत्या, हे सांगत फरीदा जलाल म्हणाल्या, “मी त्यांना म्हणाले की, फार घाणेरड्या शिव्या देणार नाही. छोट्या-छोट्या शिव्या देऊ शकते. आई-बहिणीवरून असलेल्या शिव्या तर अजिबात देणार नाही. माझं बोलणं ऐकल्यानंतर ते हसत होते.”

फरीदा जलाल असेही म्हणाल्या, “मी शिवी देत असल्याचं पाहून माझ्या चाहत्यांना आश्चर्य वाटेल हे मला माहीत होतं. मी फक्त एकदाच शिवी दिली आहे; पण तुम्ही सध्या इंटरनेटवर त्याचे परिणाम पाहू शकता. कमेंटमध्ये लोक म्हणत आहेत की, फरीदा जलाल असे म्हणाली. आपली प्रेमळ आजी असे म्हणाली. ते लहान असल्यापासून मला बघतात. त्यामुळे मीसुद्धा अशा संवादापासून दूर असते. पण, जर एखादं पात्र साकारताना त्याची गरज असेल, तर या गोष्टी करावी लागतात”, असे म्हणत त्यांनी ओ रोमिओ चित्रपटातील त्यांच्या पात्राबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.