Metro In Dino Movie : अभिनेता आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं चित्रपटातील कलाकार मंडळी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशाताच सारा, सना व आदित्य यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.
आदित्य, सारा व सना यांची नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’मध्ये मुलाखत घेण्यात आली. त्यामध्ये कपिलनं साराला तिच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारला होता. कपिलनं साराला ‘तू कशामध्ये शिक्षण घेतलं आहेस’ ,असं विचारलं होतं. त्यावर सारा म्हणाली, “मी इतिहास, राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास केला आहे”. यादरम्यान फातिमा तिला “ती खूप शिकलेली आहे”, असं म्हणते.
फातिमानं यावेळी ती १२ वीत नापास झाली होती याबद्दल सांगितलं आहे. तर कपिल शर्मानं सांगितलं की, त्याला १२वीमध्ये ४४ टक्के मिळाले होते. यावेळी तिथे उपस्थित अनुपम खेर म्हणाले, “मला १२ वीमध्ये ३८ टक्के मिळाले होते. आपल्याला सर्वांना इतके कमी मार्क पडूनसुद्धा आज आपण या मंचावर बसलो आहोत”.
कपिल शर्मानं पुढे साराला तिच्या ट्रिपबद्दल विचारलं. तो म्हणाला, “सारा नेहमी कुठे न कुठे फिरायला जातेय. फक्त माझ्या शोसाठीच ती परत येते. सारा तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी जातेस का?” त्यावर ती म्हणाली, “असं असतं, तर माझ्यासमोर कितीतरी मुलांची लाईन लागायला हवी होती मग”.
दरम्यान, ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट ४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये कलाकरांची मोठी फौज झळकणार आहे. अनुराग बासू दिग्दर्शित या चित्रपटात नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, अनुपम खेर, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका सकारल्या आहेत. तर आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र काम करीत आहेत. त्यामुळे या फ्रेश जोडीमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.