This Bollywood Movie Ran for 105 Days in Theatres : अलीकडे काही बिग बजेट चित्रपट रिलीज झाले ते अनेक दिवस थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिले गेले. तर या चित्रपटांनी जागतीक स्तरावरही कोट्यवधींची कमाई केली. पण, पुर्वी बॉलीवूडमध्ये असा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता जो तब्बल १०५ दिवस चित्रपटगृहात पाहिला जात होता.

हा चित्रपट ५१ वर्षांपूर्वी थिएटरमध्ये रिलीज झालेला. यामध्ये दिवंगत बॉलीवूड अभिनेते फिरोझ खान मुख्य भूमिकेत होते. १९६०मध्ये आलेल्या ‘घर की लाज’ या चित्रपटातून’ फिरोझ खान यांनी हिंदी सिनेमात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत पदार्पण केलं. पण त्यांना पहिल्या हिट चित्रपटासाठी अनेक वर्षं वाट पाहावी लागली. १९६५ मधील ‘उंचे लोग’ हा त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला.

‘या’ चित्रपटातून खऱ्या अर्थाने मिळाली लोकप्रियता

मात्र त्यांना खरी ओळख आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली ती ‘धर्मात्मा’ या चित्रपटामुळे. १९७५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. ‘अपराध’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘धर्मात्मा’ मध्येही फिरोझ खान यांनी निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या.

‘आयएमडीबी’च्या माहितीनुसार हेमा मालिनी, रेखा,प्रेम नाथ यांसारख्या कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला चित्रपट दिल्लीतील लिबर्टी सिनेमा येथे सलग १५ आठवडे चालला होता. सुमारे १०५ दिवस फिरोझ खान यांचा ‘धर्मात्मा’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत राहिला. इतकंच नाही, तर व्यावसायिकदृष्ट्याही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती. यामुळे १९७५ मध्ये जवळपास तीन महिने हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणून चर्चेत होता.

हॉलीवूड चित्रपटापासून प्रेरित आहे फिरोझ खान यांचा चित्रपट

फिरोझ खान खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आलेला ‘धर्मात्मा’ हा चित्रपट हॉलीवूडमधील एका ब्लॉकबस्टर चित्रपटापासून प्रेरित असल्याचं मह्टलं जातं. फिरोझ खान यांचा हा सुपरहिट चित्रपट ‘द गॉड फादर’ या हॉलीवूड सिनेमापासून प्रेरित असल्याचं मानलं जातं.